सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जिल्ह्यातील विविध कोरोना केयर सेंटरला भेटी देण्यात येत आहेत. आज माण तालुक्यातील दहिवडी म्हसवड या ठिकाणी प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. या ठिकाणी असलेल्या बाधित रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी समाधान व्यक्त केले.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनाने अधिक सतर्क होत ज्या ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कंटेन्मेंट झोन निर्माण करण्यात आले आहेत. तर, दहिवडी, म्हसवड शहरात विलगीकरण कक्ष उभारण्यात आला आहे. सध्या येथील विलगीकरण कक्षात 4 कोरोनाबाधित रुग्ण दाखल झाले असून हे रुग्ण ज्या इमारतीमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्याच्या शेजारील इमारतीमध्ये संशयित रुग्ण स्वतंत्रपणे ठेवले आहेत. या रुग्णांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते तेथील परिस्थितीचा ग्राऊंड रिपोर्ट घेण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सदिच्छा भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना समाधान व्यक्त केले. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. भारत काकडे, डॉ. मयुरी शेळके, डॉ. संध्या वाघ, मुख्याधिकारी चेतना केरुरे, स.पो.नि. गणेश वाघमोडे, तलाठी उत्तम आखडमल आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्या भागात कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. यामध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, त्या गावातील व प्रभागातील नागरिकांना बाहेर येऊ दिले जाणार नाही, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.