सातारा- जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणीसाठी लागणारे खत आणि बियाणे शासनाकडून पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार शेतकऱ्यांच्या बांधावर खत-बियाणे देणे सुरु आहे. गुरुवारी राज्याचे सहकार मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उंब्रज मंडळातील निगडी गावच्या शिवारात खत, बियाणे वाटप होणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन काळात कृषी क्षेत्र या निर्बंधापासून दूर ठेवले होते. त्यामुळेच सगळे बंद असतानाही रोज हजारो क्विंटल भाजांची आवक बाजार समित्यांमध्ये होत होती. तो माल लोकांच्या दारापर्यंत जात होता,असे विजयकुमार राऊत म्हणाले. सगळीकडे बंद असतानाही अत्यावश्यक, जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीत खंड नव्हता, त्यामुळे घरी बसूनही लोकांपर्यत भाजीपाला पोहचत होता, असेही राऊत यांनी सांगितले.
खरिपाची तयारी
सातारा जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी 1 लाख 2 हजार 923 मेट्रिक टन एवढ्या खताची मंजूरी देण्यात आली आहे. 59 हजार 943 मेट्रिक टन खताची उपलब्धता जिल्ह्यात होती. त्यापैकी 47 हजार 173 मेट्रिक टन एवढी विक्री झाली असून आता बाजारात 25 हजार 857 मेट्रिक टन खताची उपलब्धता आहे.
सोयाबीन, भात, मका आणि खरीप ज्वारी या प्रमुख पिकांच्या बियाण्याची जिल्ह्याची मागणी 47 हजार 804 क्विंटल एवढी होती. 11 हजार 309 क्विंटल एवढी बियाणांची उपलब्धता होती. यापैकी 4 हजार 662 क्विंटल एवढे बियाणे विकले गेले. आता 6 हजार 946 क्विंटल एवढे बियाणे अजूनही बाजारात उपलब्ध आहे.
शेतकऱ्यांच्या बांधांवर खत-बियाणे वाटप
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या बांधापर्यत खते-बियाणे पोहचवू असे सांगितले होते. त्याप्रमाणे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचनेनुसार 933 गटांमार्फत 4 हजार 673 मेट्रिक टन खत आणि 1 हजार 975 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांच्या बाधांवर पोहचविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली.
खरीप पीक कर्ज वाटप
सातारा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 1 लाख 23 हजार 645 शेतकऱ्यांना एकूण 692.97 कोटी पीक कर्ज वाटप करण्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी दिली. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेने 1 लाख 18 हजार 765 शेतकऱ्यांना 629.76 कोटी कर्ज वाटप केले आहे व इतर बँकांनी 4 हजार 880 शेतकऱ्यांना 63.21 कोटी कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने खरीप पेरणीसाठी आतापर्यत 57 टक्के कर्ज वाटप केले आहे. इतर बँकांनी खरीप पेरणीसाठी आतापर्यत 10 टक्के कर्ज वाटप केले आहे, अशी माहितीही जिल्हा उपनिबंधक (सहकार) प्रकाश अष्टेकर यांनी दिली.