सातारा - फलटण तालुक्यातील प्रसिद्ध डॉक्टर संजय राऊत यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले आहे. स्वतः डॉक्टर संजय राऊत यांनी अपहरण झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलवरुन रुग्णालयात काम करणाऱ्या मॅनेजरला ४ ते ५ कोटी रुपयांची जुळवाजुळव कर, असे सांगितले होते. याबाबत प्रशांत शेलार यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारीला रात्री १० वाजण्याच्या सुमारास डॉक्टर संजय कृष्णाजी राऊत हे लाईफलाईन रुग्णालयातून त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात आरोपीने त्यांचे चारचाकी वाहनातून अपहरण केले. यानंतर रात्री ११ अकरा वाजता डॉ. राऊत यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरुन मॅनेजरला फोन करुन ४ ते ५ कोटी रुपये मध्यरात्रीपर्यंत जमवण्यास सांगितले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिजित पाटील फलटण शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी डॉक्टर संजय राऊत यांच्या शोधासाठी पथक रवाना केल्याची माहिती दिली आहे.