सातारा- आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून 'कोरोना'शी लढणारे पोलीस कर्मचारी या विषाणूपासून दूर रहावेत, या प्रयत्नांचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांबाहेर 'सॅनिटायझर चेंबर्स' उभारण्यास सुरुवात झाली.
शुक्रवारी सातारा तालुक्यातील ४ पोलीस ठाण्यांमध्ये ही चेंबर्स कार्यान्वित झाली. टप्प्याटप्प्याने येत्या दोन दिवसात ही चेंबर्स जिल्ह्यातील सर्व २७ पोलीस ठाण्यांमध्ये कार्यान्वित होतील,असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पोलीस अधिकारी, कर्मचारी जेव्हा ड्युटी करून घरी जातात किंवा घरातून कामावर येतात त्यावेळी काही सेकंद सॅनिटायझर चेंबर मधून जावे लागते. निर्जंतुकीकरणाच्या प्रक्रियेमुळे पोलीस कर्मचा-यांस या विषाणूपासून दूर राहण्यास मदत होणार आहे.
सॅनिटायझर चेंबरमध्ये प्रेशर फाॉगिंग मशिनचा वापर करण्यात आला आहे. पोलीस निर्जंतुकीकरण होऊनच कामावर किंवा कामावरुन घरी जाणार आहेत. शुक्रवारी शाहूपुरी, सातारा शहर, सातारा तालुका, बोरगाव या पोलीस ठाण्यात ही यंत्रणा बसवण्यात आली.
कोरोना प्रसार वाढत असल्याने त्याचा धोका नागरिकांना आहे तसाच पोलीसांनाही आहे. त्यामुळे त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.