कराड (सातारा) : पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडाचा झेंडा फडकवला आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. याच अनुषंगाने स्वाभिमानीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कराड येथील विश्रामगृहात राजू शेट्टींसमवेतच्या बैठकीत आक्रमक पवित्रा घेत मागे न हटण्याचा निर्धार केला.
थकित एफआरपीप्रकरणी राजू शेट्टी हे सह्याद्रि कारखान्यावरील आंदोलनासाठी आले असताना कराड येथील विश्रामगृहावर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. प्रारंभी सर्वच कार्यकर्त्यांसमोर साधक-बाधक चर्चा झाल्यानंतर इतरांना बाहेर काढून पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत शेट्टींची कमराबंद बैठक झाली.
ताकदीने निवडणूक लढवायची असेल, तर केवळ लोकभावना असून उपयोग नाही. संघटनात्मक बळ किती लागेल, हेही पाहिले पाहिजे. मागील एक वर्ष आपण महाविकास आघाडीबरोबर गेलोय. त्यामुळे चांगले-वाईट परिणाम या निवडणुकीनंतर दिसतील. सर्व परिणाम आणि येणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका, या सर्वांचा परिणाम विचारात घेऊन जर आपण सगळे वेळ देणार असू, तर होकार देऊया, अशी भावना स्वाभिमानी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी व्यक्त केली.
मतदार संघात परिस्थिती चांगली आहे. वातावरण तयार होऊ शकते. फक्त वेळ दिला पाहिजे. चित्र बदलू शकते आणि चित्र बदलल्यानंतर कदाचित आपल्याला सवतीची वागणूक मिळू शकते. या सर्व शक्यता गृहीत धरून निवडणुकीचा निर्णय घ्यावा लागेल, असेही अनिल पवार म्हणाले. जरी पदरात यश पडले नाही, तरी गटबांधणी चांगली होणार आहे. लोकांना विश्वास दिला जाऊ शकतो. आपण जेवढी मते घेऊ, तेवढ्या लोकांसाठी सतत कार्यरत रहावे लागेल, याचीही आठवण पवार यांनी करून दिली.
राजू शेट्टी यांच्या आदेशाचे मी पालन करणार आहे. मतदार संघात लोकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे. आम्ही देणगी देतो, पण तुम्ही लढा, असे लोक म्हणत असल्याचे स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सचिन पाटील यांनी सांगितले. पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरूण लाड हे चुकीचे स्टेटमेंट देत असून त्यांनीच आपल्याला फसवल्याचे कार्यकर्त्यांनी शेट्टी यांना यावेळी सांगितले.
कमराबंद चर्चेत काय ठरले..? -
राजू शेट्टी यांनी मोजक्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत निवडणुकी संदर्भात कमराबंद चर्चा केली. त्याचा तपशील समजू शकला नाही. मात्र, स्वाभिमानीच्या उमेदवारीमुळे सर्वच प्रस्थापित पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात बरेच साखर कारखाने आहेत. त्यामुळे पंढरपूर परिसरातील आंदोलने धारदार असतात. स्वाभिमानी संघटनेला मानणार्या लोकांची संख्याही मोठी आहे. या सर्व बाबी पाहता स्वाभिमानी संघटनेची उमेदवारी प्रस्थापितांपुढे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काय घडामोडी होणार, याकडे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे लक्ष असणार आहे.