सातारा : सध्या कोव्हिड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे ताबडतोब बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व आमच्या सर्वांच्या चर्चेतून काशीळ ग्रामीण रुग्णालयाच्या वास्तूचा विचार केला आहे. या भव्य वास्तूमध्ये आयसीयूचे ५० बेड बसू शकतील. पुढील आठ दिवसात काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
महामार्गावर काशीळ (ता. सातारा) येथे उभारणी सुरू असलेले ग्रामीण रूग्णालय कोव्हिडच्या रूग्णासाठी वापरता येईल का? यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, कार्यकारी अभियंता दराडे, प्रातांधिकारी मिनाज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, सर्वसोयी सुविधायुक्त रूग्णालय व्हावे अशी मागणी या परिसरातील अनेक गावातील लोकांची होती. त्यानुसार येथे ग्रामीण रूग्णालय मंजूर केले. या रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्यात आहे. कोव्हिड बाधितांची संख्या वाढत असल्याने अतिरिक्त बेडची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने या इमारतीचा विचार केला असून आठ दिवसात आवश्यक कामे पूर्ण केली जातील. सातारा व कऱ्हाड या शहराच्या मध्यवर्ती हे रूग्णालय असल्याने काशीळ ग्रामीण रूग्णालयाचे ट्रामा सेंटरमध्ये रूपांतर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच कामिनी तळेकर, माजी पंचायत समिती सदस्य जयवंत कुंभार, भरत माने, चंद्रकांत जगताप, माजी सरपंच अंकुश माने, प्रकाश जाधव, धनाजी माने, सुरेश माने आदी उपस्थित होते.