सातारा - राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद सातत्याने वाढत आहे. संपूर्ण देशात पक्षाची चर्चा आहे. राज्याच्या आगामी विधानसभेत रासपचे १५ आमदार निवडून येतील. आणि खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीप्रमाणे रासप किंगमेकर असेल, असा दावा माजी पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केला.
हेही वाचा - सांडपाण्यामुळे साताऱ्याच्या सार्वजनिक आरोग्यात 'कालवा'कालव !
माण-फलटणमध्ये रासपचा आमदार असेल
नगरपालिका मंगल कार्यालयात रासपचा मेळावा झाला. त्यावेळी पत्रकार परिषदेत आमदार जानकर बोलत होते. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघावर रासपने लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये रासपची ताकद मोठी आहे. तेथे रासपचे आमदार निवडून येतील. राज्यात खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष जसा किंगमेकर आहे, तसा भविष्यामध्ये रासप पक्ष निश्चितपणे भूमिका बजावेल.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी कायदे
केंद्राच्या कृषी कायद्यांचे आमदार जानकर यांनी समर्थन केले आहे. केंद्रीय कृषी मंत्री पदावर असलेले तोमर हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगली माहित आहे. काँग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी विधेयके मंजूर केली आहेत. कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे जानकर म्हणाले.
सत्तेत असतो तर...
महायुती सरकारच्या काळामध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना मी गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही. सत्तेवरील महाविकास आघाडी सरकारची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गाईच्या दुधाला ६५ रुपये आणि म्हशीच्या दुधाला ८५ रुपये दर दिला असता, असा दावा देखील जानकर यांनी केला.
हेही वाचा - सातारा : महादरेला लवकरच 'फुलपाखरु संवर्धन राखीव'चा दर्जा