सातारा - रात्री सालपे घाटातील एका वळणावर ट्रकला अडवून ट्रकचालक व त्याच्या सहायकाचे हातपाय बांधून माल वाहतूक करणारा ट्रक व त्यातील लोखंडी कास्टिंगचे साहित्य लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून 14 लाख 59 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
11 जणांची टोळी
लोणंद पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना हे यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर अधीक्षक धीरज पाटील, उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ उपस्थित होते. बन्सल यांनी सांगितले की, दि.13 रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास सांगलीवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रकला (एम एच 12 एचडी 4892) एक वळणावर मागच्या वाहनातून आलेल्या सुमारे अकरा जणांनी अडवले होते. चालक व त्याच्या सहाय्यकाचे हात पाय दोरीने बांधून, दरोडेखोर ट्रक व लोखंडी कास्टिंग घेवून फरार झाले होते.
सहाय्यकाकडे संशयाची सुई
याबाबत ट्रक चालक भाऊसाहेब जिजाबा शिंदे (रा. बाबुळसर, जि. पुणे) यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत लोणंद पोलीस व एलसीबी यांच्या संयुक्त पाच टिम संशयितांच्या मागावर होत्या. दरम्यान फिर्यादी शिंदे व त्यांच्यासोबत आलेला त्यांच्या सहाय्यक या दोघांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्या सहाय्यकाकडे तपासाची दिशा केंद्रित केली. सहाय्यकाकडे कसून चौकशी केली असता व त्याच्या फोनचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर, तोच या कटाचा सुत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.
अन् तो पोपटासारखा बोलू लागला
त्याच्या अधिक चौकशीत यातील काही आरोपी हे चोरीचा माल विकण्यासाठी नागापूर (अहमदनगर) येथील एमआयडीसीत गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तिथे धाड टाकून माल विकण्याआधीच ताब्यात घेतला व चार आरोपींना अटक केली. अटकेतील त्या चौघांकडून माहिती घेतली असता इतर माल हा सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे ठेवल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी उर्वरीत माल व ट्रक असा एकूण 14 लाख 59 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सर्व संशयित सांगलीचे
सतिश विष्णू माळी, सुनिल ढाकाप्पा कदम, सौरभ सुधाकर झेंडे, आकाश शैलेंद्र खाडे, गुरूप्रसाद सुदाम नाईक, सुशांत रमेश कांबळे, ज्ञानेश्वर दत्तात्रय पवळ, प्रतिक कुमार नलवडे, किरण राजाराम माळी (सर्व रा. कवलापूर, जि.सांगली), विजय संभाजी चौगुले (रा.संजयनगर,सांगली), संग्राम राजेश माने (रा. बोरगाव, ता. कवठेमहांकाळ) यांना अटक केली. ही कारवाई लोणंदचे सहाय्यक निरीक्षक विशाल वायकर, रमेश गर्जे, सचिन राऊत, फौजदार गणेश माने, उस्मान शेख, हवालदार शरद बेबले, नितीन गोगावले, गणेश कापरे, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, रोहित निकम, महेश सपकाळ, अविनाश नलवडे, संतोष नाळे, ज्ञानेश्वर साबळे, अभिजीत घनवट, विठ्ठल काळे, श्रीनाथ कदम, अमोल पवार, सागर धेंडे, केतन लाळगे, नितीन चतुने, सर्जेराव सुळ, सुजित मगांवडे, दिग्विजय सांडगे, देवा तुपे, महेश जगदाळे, सचिन पाटोळे यांनी केली.
हेही वाचा - रेमडेसिवीरच्या खरेदीत घोटाळा नाही, जीव वाचवणे महत्वाचे - महापौर किशोरी पेडणेकर