सातारा: ऐन फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. बुधवारी सायंकाळी कोयना धरणाच्या विमोचक गेटमधून 1000 क्युसिक पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पायथा विद्युत गृहातील एक युनिट सुरू आहे. त्यामुळे विमोचक गेट आणि पायथा वीजगृहातून 2050 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
सिंचनासाठी 2050 क्युसेक पाणी सोडले: उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी सांगली पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यानुसार बुधवारी सायंकाळी कोयना धरणाचे विमोचक गेट उघडून 1 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1050 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे धरणातून एकूण 2050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणातील पाण्याची पातळी 2133 फूट आणि 73.10 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
पाणी सोडण्याची दुसर्यांदा मागणी: पुर्वेकडील सिंचनासाठी फेब्रुवारी महिन्यात दोनवेळा कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झाली आहे. यापुर्वी याच महिन्यात 6 फेब्रुवारी रोजी पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक आणि धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडून 1500 क्युसेक, असे एकूण 3600 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले होते. यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा वापर वाढला आहे.
वीजगृहातील एकच युनिट कार्यान्वित: सध्या कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील दोनपैकी एकच युनिट सुरू आहे. पायथा वीजगृहातून सोडलेल्या पाण्यावर एका युनिटमधूनच वीजनिर्मिती होत आहे. विमोचक गेटमधील पाणी देखील वीजनिर्मितीविना नदीपात्रात जात असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होणार आहे. तथापि, विमोचक गेट बंद केल्यानंतर पुन्हा पायथा वीजगृहातील दोन्ही युनिट कार्यान्वित करून पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती केली जाईल.
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण: साताऱ्यातील कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरणाला महाराष्ट्राची वरदायिनी आणि उद्योगविश्वाचा कणा मानले जाते. जलसंपदा विभागाने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त धरणावर नेत्रदीपक तिरंगी रोषणाई केली होती. यामुळे कोयना धरणाची भिंत तिरंग्यात उजळून निघाली होती. सांडव्यातून पडणाऱ्या पाण्यावर प्रजासत्ताक दिनी तिरंगी प्रकाशझोत टाकण्यात आले होते. तिरंगी रोषणाईचा हा नेत्रदीपक नजारा डोळ्यांचे पारणे फेडत होते.