सातारा (कराड) - रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सोमवारी (१४ डिसेंबर) विक्रमी ९ हजार २०० मेट्रिक टन गाळप केले. कारखान्याच्या इतिहासात एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.
विद्यमान संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम यापूर्वी सहा वेळा झाला आहे. कारखान्याच्या ६१ वर्षांच्या इतिहासात सोमवारी झालेल्या सर्वोच्च गाळपामुळे कृष्णा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याचे डॉ. भोसले म्हणाले. कृष्णा कारखान्याने या हंगामात आतापर्यंत प्रतिदिन सरासरी ८ हजार मेट्रिक टनाहून अधिक क्षमतेने एकूण २ लाख ७० हजार मे. टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यामध्ये ३ लाख १० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.२१ टक्के मिळाला असल्याची माहिती डॉ. सुरेश भोसलेंनी दिली. सुसज्ज कृषी महाविद्यालय, द्रवरूप जिवाणू खत प्रकल्प, जयवंत आदर्श कृषि योजना, एकरी १०० टन उत्पादनाची ऊस विकास योजना, कारखाना व डिस्टलरीचे आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण योजनेची अंमलबजावणी, असे सभासद हिताचे निर्णय संचालक मंडळाने राबवले आहेत, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.
विक्रमी गाळापाची हॅट्रिक -
कोरोनासारख्या महामारीच्या काळातही कृष्णा कारखान्याने अनेक पातळ्यांवर गळीत हंगाम यशस्वी करत ऊसतोड मजुरांसह ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलासा दिला आहे. जानेवारी २०२० ते आज अखेर सलग तीन वेळा एका दिवसात विक्रमी गाळप केले आहे. १ जानेवारी २०२० या दिवशी ९ हजार २० मे.टन, १२ डिसेंबर २०२०ला ९ हजार मे.टन आणि १४ डिसेंबर २०२०ला सर्वोच्च ९ हजार २०० मे. टन उसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.