सातारा - मागच्या वर्षी कोरोनाच्या महासंकटामुळे महाराष्ट्रासह गुजरात व लगतच्या इतर राज्यातील पर्यटकांना कास पुष्प पठारावरील रानफुलांच्या रंगोत्सवाचा आनंद घेता आला नाही. यामुळे त्यांच्या हिरमोड झाला होता. मात्र, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कास पठार पर्यटकांसाठी खुले होणार आहे. यामळे पर्यटकांना या रानफुलांच्या रंगोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.
गेल्यावर्षी कोरोनाचे सावट -
कास कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती समितीचे मावळते अध्यक्ष बजरंग कदम यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. त्यांनी सांगितले, कोरोनाच्या सावटामुळे गेल्यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नव्हता. मात्र, नुकतेच जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सार्वजनिक वावराबाबतचे निर्बंध शिथिल केल्याने कास पठार यंदा पर्यटकांसाठी खुले करण्याचे ठरले आहे. सर्वसाधारण २५ ऑगस्टनंतर परिस्थिती पाहून पर्यटकांना पठारावरील प्रवेश खुला केला जाईल.
ऑनलाईन बुकींगला प्राधान्य -
कोरोनाला प्रतिबंधन करणारे नियम पाळणारांनाच प्रवेश असेल. ऑनलाईन बुकींग करणारांना प्रवेश सुलभ असेल. रोज केवळ तीन हजार पर्यटकच पठारावर जाऊ शकतील. माणशी १०० रुपये प्रवेश शुल्क आकरण्यात येणार आहे. वाहन पार्कींग, गाईड शुल्क, बस प्रवास, कॅमेरा शुल्क आदींसह अन्य शुल्कही आकारले जाईल.
हेही वाचा - बैलगाडी शर्यत प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल
सप्टेंबरमध्येच खरा बहर -
सध्या हलक्या स्वरुपाचा पाऊस असल्याने पठारावर रानहळदीची पांढरी फुले पहायला मिळत आहेत. तर काही प्रजातींच्या फुलांच्या तुरळक कळ्या उमलू लागल्या आहेत. दोन आठवड्यात पठारवर रंगीबेरंगी फुले पाहायला मिळतील. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर पठार फुलांच्या गालिचाने सजलेले पाहायला मिळेल.
बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन -
'यावर्षी हंगाम संपल्यानंतर कास पठार व ठोसेघर परिसरातील काही चांगल्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना व्हावी यासाठी बस फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन आहे,' असे साताऱ्याचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले.