सातारा - जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे हाडवैरी समजले जाणारे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांच्यात काल सायंकाळी बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीने दोघांतील राजकीय संघर्ष समेटापर्यंत पोहचल्याची गरमागरम चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिरवळ एमआयडीसी प्रकरणातून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपाप्रवेश केला. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात जोरदार राजकीय शेरेबाजी रंगली आणि मतभेदाची दरी आणखी वाढली. रामराजेंच्या टीकेला जोरदार उत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी फलटण गाठले होते. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसाच्या सभेतही रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर कडवी टीका केली होती. काही वेळा दोन्ही राजे साताऱ्यातील विश्रामगृहातच आमनेसामने आले होते. तेव्हा तो राजकीय ताण सांभाळताना पोलिसांची प्रचंड तारांबळ उडाली होती.
दोन्ही राजांमध्ये दिलखुलास गप्पा!
शनिवारी संध्याकाळी खासदार उदयनराजे भोसले सव्वासहा वाजण्याच्या सुमारास एका बैठकीच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात पोहचले. तेव्हा तेथील कक्ष क्रमांक एकमध्ये रामराजे नाईक निंबाळकर आधीपासूनच उपस्थित होते. ही माहिती मिळताच उदयनराजे यांनी त्यांच्या दालनात जाऊन रामराजेंना नमस्कार केला. रामराजेंनी सुद्धा प्रतिसाद देत उदयनराजे यांना नमस्कार केला. नंतर दोन्ही राजांनी कटूता बाजूला सारत दिलखुलास गप्पा मारल्या.
दोन्ही राजेंची भेट योगायोगाने
दोन्ही राजेंची भेट योगायोगाने झाली. त्यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ एकमेकांनी तब्बेतीची चौकशी करून काळजी घ्या, असे सांगितल्याचे दोन्ही राजेंच्या स्नेही मंडळींनी सांगितले. कितीही विसंवाद झाला तरी राजशिष्टाचाराचे संकेत दोन्ही राजेंनी मात्र आवर्जून पाळल्याचे दिसले.
हेही वाचा- ऊस दरासंदर्भातील बैठक निष्फळ; 'या' मागणीवर स्वाभिमानी ठाम
हेही वाचा- कृषी कायद्याविरोधात खामगावात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन