सातारा - कराड उपविभागाचा नुकताच चार्ज घेतलेल्या नूतन डीवायएसपई अमोल ठाकूर यांनी एकाच दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. सकाळी कॅफेंवर छापे मारून अश्लील चाळे करणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतले तर दुपारी बेकायदेशीर पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या एकास सापळा रचून पकडले. या दमदार कारवाईतून ठाकूर यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. कराड तालुक्यात गुन्हेगारी आणि गुन्हे गारांना थारा मिळणार नाही. तसेच गैरकृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असाच संदेश या कारवाईतून उपविभागीय अधीक्षकांनी दिला आहे.
कराडमधील तीन कॅफेंवर छापा - महाविद्यालयांच्या परिसरातील कॅफेंमध्ये कॉलेज तरूण-तरूणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह छापे मारून वीस ते पंचवीस तरुण आणि तरुणींना ताब्यात घेतले. कॅफे चालक आणि तरुणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. विद्यानगर परिसरात कराडमध्ये मोठी सात महाविद्यालये आहेत. तसेच इतर अनेक शैक्षणिक संस्था आहेत. देशभरातून या भागात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. त्यांच्या वाममार्गाला लागण्याला आता चाप बसल्याची चर्चा आहे.
तरूणाकडून पिस्टल जप्त - खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी आपल्या पथकाला सूचना देऊन कराड बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात सापळा रचून बेकायदेशीर पिस्टल विक्रीसाठी आलेल्या संशयिताला पकडले. शंकर जाधव (रा. वाघेश्वर-मसूर, ता. कराड), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून पिस्टल, मॅग्झिन आणि एक जिवंत काडतुस, असा ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
डीवायएसपींची पहिली कारवाई - कराड उपविभागाचा पदभार अमोल ठाकूर यांनी नुकताच स्वीकारला आहे. या तरूण अधिकाऱ्याने एकाच दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या. त्यांच्या कारवाईची समाजात मोठी चर्चा झाली. ठाकूर यांचे वाचक फौजदार आर. पी. पुजारी, सहाय्यक फौजदार अरुण दुबळे, पोलीस अंमलदार सागर बर्गे, असिफ जमादार, प्रवीण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.