सातारा(कराड) - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सर्व दुकाने आणि व्यवहार बंद आहेत. मात्र, काही तळीरामांची तहान भागवण्याचे काम काही दारू विक्रेते करत असल्याचे समोर आले. कराडमधील पाटण तिकाटणे परिसरात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असलेल्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, रोख रक्कम आणि मोटरसायकल, असा २९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
कराड शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार सतीश जाधव यांना पाटण तिकाटणे परिसरातील गोकुळ हॉटेलमध्ये बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलवर छापा मारून २९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेल चालक शंकर किसन राठोड आणि त्याचा साथीदार अशोक येळवे यांना पोलिसांनी अटक केली आहे.