सातारा - शरद पवार यांनी साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची कॉलर वर केली होती. यावर आज रामदास आठवले यांनी आपल्या कवितेतून जोरदार हल्लाबोल केला. 'पवार साहेबांनी ज्याची कॉलर ओढली, ती सीट आम्ही पाडली' अशी कविता आठवले यांनी पत्रकार परिषदेत म्हणताच एकच हास्यकल्लोळ उडाला.
सातारा लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप रिपाईचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रामदास आठवले म्हणाले, की नरेंद्र मोदी आणि मी जोपर्यंत एकत्र आहे. तोपर्यंत काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर राहील, विरोधी पक्षनेत्याला केबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतो. ते पद राहुल गांधी यांना नक्की मिळेल असा टोलाही रामदास आठवले यांनी लगावला.
वंचित बहुजन आघाडीचा परिणाम होऊ शकतो का ? असा सवाल त्यांना यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आठवले म्हणाले, वंचित बहुजन आघाडीसारखे अनेक प्रयोग आम्ही करुन बसलो. आम्हाला शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनही निवडून येऊ शकत नाहीत. वास्तविक वंचित बहुजन आघाडीची मते भाजपच्या पथ्यावर पडतील, असेही आठवले म्हणाले.