कराड (सातारा) - कराड दक्षिण मतदार संघात अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण हे पाचवड (ता. कराड) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. पिकांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी कराड तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, इंद्रजित चव्हाण यांच्यासह पाचवड गावचे शेतकरी उपस्थित होते.
कराड दक्षिणमध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या परिस्थितीचा आढावा त्यांनी प्रशासनाकडून घेतला होता. तरीही थेट बांधावर जाऊन त्यांनी बाधित क्षेत्राची पाहणी केली. कराड दक्षिणमधील बाधित क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. सर्व पंचनामे पुर्ण झाल्याची खात्री करून मुख्य अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. तसेच लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असा आधार त्यांनी शेतकऱ्यांना दिला.
अतिवृष्टीने खचलेल्या रस्ते आणि पुलांची देखील त्यांनी पाहणी केली. रस्ते आणि पुलांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर शासनाकडे पाठविण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
१० हजार कोटीचे पॅकेज-
अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधकांनीही बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी देखील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर २३ तारखेला शेतकऱ्याच्या मदतीसाठी सुमारे साडेपाच हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. ही मदत लवकरच शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला.