सातारा (कराड) - पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर या काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये ३५ वर्षाहून अधिक काळ विळ्या-भोपळ्याचे सख्य होते. ते आज खर्या अर्थाने संपुष्टात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कराडमध्ये झालेल्या काँग्रेस मेळाव्यात चव्हाण-उंडाळकरांच्या कार्यकर्त्यांचा प्रीतिसंगम पहायला मिळाला.
सातारा जिल्हा काँग्रेसमय करण्याचा निर्धार -
मतभेदांना तिलांजली देत दोन्ही गटांनी सातारा जिल्हा पुन्हा काँग्रेसमय करण्याचा निर्धार केला. प्रदेशाध्यक्षांच्या साक्षीने पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर यांनी काँग्रेसच्या गतवैभवाचे दाखले देऊन कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली. हे मनोमिलन नसून प्रीतिसंगम आहे. राज्यात गरज असेल तेथे 'कराड पॅटर्न' राबविणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
जिल्हा काँग्रेसमध्ये होती गटबाजी
गेली ५० वर्षे विलासकाका उंडाळकर यांनी कराड दक्षिणसह सातारा जिल्ह्यात काँग्रेसचा विचार तेवत ठेवला. १९७८पासून २०१४पर्यंत सातारा जिल्ह्यावर त्यांनी वर्चस्व राखले. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सहकारी संस्थांमध्ये सामान्यांना पदे दिली. त्यामुळे कराड दक्षिण काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. पृथ्वीराज चव्हाण-विलासकाका उंडाळकर यांच्यातील राजकीय मतभेदांमुळे सातारा जिल्हा काँग्रेसमध्ये दोन गट होते. या वादावर पडदा टाकून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी दोन्ही गटांकडून पावले टाकण्यात आली. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघ झाला.
काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू-
ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची दुरवस्था होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. आम्ही काँग्रेसची विचारधारा मानणारे आहोत. पूर्वीचे सर्व काही विसरून काँग्रेस पक्षाला गतवैभव आणण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस एकसंघ झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदलल्याशिवाय रहाणार नाही, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
उंडाळकर कुटुंबाने नेहमीच काँग्रेसची विचारधारा जोपासली. जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील यांनी सुद्धा काँग्रेसचा विचार बळकट करण्यासाठी पाऊल टाकले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा बळकट होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
'काँग्रेसमुक्त भारत'चा नारा लोकशाहीला गिळकृंत करणारा -
मोदी-शहा जोडगोळीने 'काँग्रेसमुक्त भारत'चा दिलेला नारा लोकशाहीला गिळकृंत करणारा आहे. त्यांचेच चेले असलेले देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी २०१९च्या निवडणुकीपूर्वी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला. काँग्रेसचे ४०पेक्षा जास्त नेते भाजपात घेतले, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली आणि भाजपला दूर ठेऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याचे चव्हाण म्हणाले.
२०१४च्या निवडणुकीवेळी भाजपकडून ऑफर -
विलासकाका उंडाळकर म्हणाले, काँग्रेसची विचारधारा सोडून जातीयवादी पक्षाशी हात मिळवणी करणे. हे आमच्या विचारात बसत नव्हते. त्यामुळे २०१४च्या निवडणुकीवेळी भाजपकडून ऑफर असतानाही काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधिल असल्यामुळे आम्ही त्या ऑफरला ठोकर मारली. आज केंद्रातील भाजप सरकार देशात व्देष पसरवत आहे. जातीयवादी भाजपला धडा शिकविण्यासाठी काँग्रेस मजबूत करणे गरजेचे आहे.
प्रबोधनातून कार्यकर्त्यांचे मन परिवर्तन करणे गरजेचे -
कराड दक्षिणच्या जनतेने सलग ३५ वर्षे मला साथ दिली. यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला बेरजेच्या राजकारणाचा विचार दिला. तोच विचार आम्ही मतदारसंघात राबवित आहोत. २००३ साली कराडच्या शिवाजी स्टेडियमवर सोनिया गांधींच्या झालेल्या सभेला २ लाख लोक उपस्थित होते. तेव्हा काँग्रेसने २००४ची विधानसभा निवडणूक जिंकून दाखवली होती, असेही उंडाळकरांनी सांगितले. सध्या देश आर्थिक, सामाजिक व्देषात गुरफटला असून प्रबोधनातून कार्यकर्त्यांचे मन परिवर्तन करणे गरजेचे आहे. यशवंतरावांनी शिक्षण, माथाडी कायदा समृद्ध केला. परंतु, काँग्रेसची कामे लोक विसरत आहेत. काँग्रेसची विचारधारा, मूल्य, संस्कृती जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.
उंडाळकरांना प्रदेश काँग्रेसमध्ये महत्वाची जबाबदारी-
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना पक्षात मोठी जबाबदारी देणार असल्याचे सुतोवाच केले. उदयसिंह यांना सातारा जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातील नेतृत्व अधिक प्रगल्भ होईल, असे थोरात म्हणाले.
उंडाळकर कुटुंबाला स्वातंत्र्य सैनिकाचा, समाजकारण आणि राजकारणाचा वारसा आहे. विलासकाकांनी सलग ३५ वर्षे कराड दक्षिणचे नेतृत्व केले. त्यांचा स्वभाव तापट आहे. परंतु, कार्यकर्त्याला त्यांनी तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपले आहे. अशा कुटुंबातील तरूण नेतृत्वाला काँग्रेस महत्वाची जबाबदारी देणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
हेही वाचा- मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा - मुख्यमंत्री
हेही वाचा- आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाची जनजागृती रॅली