सातारा : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करताच त्यांचे सर्वाधिक प्रेम असलेल्या सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. शरद पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी दशेपासून शरद पवार यांच्या सानिध्यात राहिलेले सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि सातार्याचे खासदार आणि श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. आज सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष नसल्या तरी त्यांचे राजकारण आणि पक्षातील स्थान कायम आहे, असे उदाहरण देखील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे.
आम्ही त्यांच्या पाठीशी : शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा घेतलेला निर्णय धक्कादायक आहे. परंतु, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असणार आहोत. केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय पदावर न राहण्याचा त्यांचा मानस दिसत आहे, असे खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. शरद पवार आणि मी 1958 मध्ये युवक काँग्रेसमधून आमच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात केली.
ते बांधतील तेच तोरण : त्यांनी सलग 65 वर्षे समाजसेवा केली. निवृत्त होण्याचा निर्णय घेऊन त्यांनी पुढील पिढीसाठी धोरण आखले असेल. ते बांधतील ते तोरण हीच कार्यकर्त्यांची भूमिका राहिल. भावी पिढीला मार्गदर्शन आणि संस्था अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत, असे त्यांच्या निर्णयावरून वाटत असल्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. शरद पवार साहेबांचे पद हे राज्याच्या, देशाच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च आणि महत्वाचे पद आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका पवार साहेबांची राहिली आहे. त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत धक्कादायक असल्याचे माजी सहकार मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी केली.