सातारा - भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी कोरोना परिस्थितीचाही राजकीय गैफायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला. भाजपने कितीही प्रयत्न केला, तरी सरकार स्थिरच राहिल, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नेते शरद पवार अनुभवी आहेत. त्यांना सल्ल्यासाठी कोणी बोलवले, तर त्याची वेगळी चर्चा होण्याची गरज नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही काल त्यांच्याशी काही महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली. त्यावरून सरकार अस्थिर आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु, ती चर्चा निरर्थक असल्याचेही चव्हाण म्हणाले.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे टीका करणे योग्य नाही. कोरोनासारखे गंभीर संकट असताना पदावर असणार्या कोणीही राजकीय लाभाकरिता गैरफायदा घेऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. राज्यपालांच्या भूमिकेचा जास्त अपप्रचार होत आहे. वास्तविक सरकार अस्थिर करावे, अशी त्यांची भूमिका नाही, असा खुलासाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तसेच भाजपमधील काही लोकच सरकार अस्थिर झाले असल्याचा प्रचार करत आहेत, असेही ते म्हणाले.
सत्तेला हपापलेल्या भाजपमधील लोकांना ऐनकेन प्रकारे सत्तेत यायचे आहे. त्याच लोकांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार, अशा बातम्या सोडल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. महाराष्ट्र सरकार चांगले काम करत आहे. कोरोनाच्या सर्वाधिक टेस्टिंग महाराष्ट्रात होत आहेत. टेस्टिंगच केले नाही, तर कोण आजारी आहे, हे कळणारच नाही, अशी वस्तूस्थिती आहे. परंतु, ज्या राज्यात टेस्टिंगच होत नाही. ते राज्य आम्हाला शिकविणार का? असा उपरोधिक सवालही चव्हाण यांनी केला.
अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला रोख पैसे ओतावे लागतील. त्यासाठी अमेरिका, इंग्लड, जर्मनीसारख्या देशांची उदाहरणे मी दिली आहेत. त्याप्रमाणे पैसे उभे करून, लोकांना विश्वासात घेऊन ते पैसे खर्च करण्याची तयारी केंद्र सरकारने दाखवायला पाहिजे. परंतु, सरकारची ती मानसिकता दिसत नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. कर्ज काढले पाहिजे. कर्जरूपाने पैसे उपलब्ध करून ते खर्च करण्याची सूचना आपण केली होती. कर्ज काढण्याचे अनेक प्रकार आहेत. नोटा छापायचा एक भाग असतो. तसेच आरबीआयकडून कर्ज घेता येते. सोने गहाण ठेवायचे की विकायचे, त्याचाही निर्णय घेता येतो. आज लोकांचे जीव आणि शक्य तेवढे रोजगार वाचविण्यासाठी उपलब्ध अस्त्रांचा वापर सरकारने करायला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले.