सातारा - जम्मू काश्मीरमध्ये घटनेतून कलम 370 हटवण्याची शिफारस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली. त्यानंतर राज्यसभेत बराच गदारोळ झाला. विरोधकांनी या निर्णयावर तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही जोरदार टीका केली आहे. मोदी सरकारने काश्मिरी जनतेचा विश्वासघात केला, अशी टीका चव्हाण यांनी केली आहे.
पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, 370 हे कलम तात्पुरते होते. त्याची तीव्रता काँग्रेसने कमी केली होती. मोदी सरकारने जनतेला विश्वासात घेऊन कलम रद्द करायला हवे होते. मात्र, जम्मू-काश्मीरला लष्करी छावणीचे स्वरुप देऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यावरुन असे स्पष्ट होते की, गेल्या 5 वर्षात मोदी सरकारला जम्मू-काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेता आले नाही.