कराड (सातारा) - चोरटे कधी काय चोरतील, याचा नेम नसतो. अशीच एक घटना पाटण तालुक्यातील कोयनानगरजवळच्या रासाटी गावात घडली आहे. ऊसतोड मजुरांच्या टोळीतील एकाने रासाटी गावातील दुकानातून अंडी चोरून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांच्या सतर्कतेमुळे त्याचा प्रयत्न फसला. मिथुन कारसिंग बारेला, असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर कोयनानगर पोलिसांनी सीआरपीसी 109 अन्वये कारवाई केली आहे.
ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कोयनानगर भागात आल्या आहेत. त्यातील मिथुन बारेला हा ऊसतोड मजूर रासाटी गावातील दुकानात गेला. दुकान मालक महिला आपल्या कामात व्यस्त होती. ही संधी साधून मिथुन याने दुकानाच्या काऊंटरवरील अंड्याचे ट्रे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील तरुणांनी त्याला पकडले. या झटापटीत त्याच्या हातातील ट्रे खाली पडल्याने अंडी फुटली. ही घटना पाहून लोक गोळा झाले. लोकांनी त्याला पकडून ठेवले. चोरी पकडली गेल्यामुळे तो सैरभैर झाला. आपल्याकडे चाकू असून मीच माझा गळा चिरून तुम्हाला अडकविन, अशी धमकी तो लोकांना देत होता.
हेही वाचा-कोरोनाच्या राज्यावरील ग्रहणाला वर्ष पूर्ण; दुसरी लाट थोपविण्याचे आव्हान
संशयित चोरटा आणि नागरिकांचा बराच वेळ गोंधळ सुरू होता. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या समोरही बराच शाब्दीक राडा झाला. त्यानंतर नागरिकांनी चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला कोयनानगर पोलीस ठाण्यात नेले. तथापि, दुकान मालकाची त्याच्याविरूध्द तक्रार नसल्याने पोलिसांनीच सीआरपीसी 109 अन्वये त्याच्यावर कारवाई केली. मिथुनच्या अंडी चोरीच्या फंड्याची आणि स्टंटबाजीची सध्या कोयनानगर, रासाटी परिसरात जोरदार चर्चा आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या काळात गर्दी टाळण्याकरता नाशकात शनिवारसह रविवारी टाळेबंदी जाहीर