सातारा - मेहनत आणि प्रामाणिकपणाची ताकद काय असू शकते हे ऑलम्पिकपर्यंत पोहोचलेल्या प्रवीण जाधवच्या आई-वडिलांनी दाखवून दिले आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पालक अजूनही करतात मजुरी
सातारा जिल्ह्यातील तरडे (ता.फलटण) येथील प्रवीण जाधव हा खेळाडू जपान येथे होणाऱ्या टोकीयो ऑलम्पिक स्पर्धेत धनुर्विद्या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेले खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांशी वेबच्या माध्यमातून संवाद साधत या खेळाडूंना प्रोत्साहित केले. मजूर कुटुंबातून पुढे आलेला प्रवीण जाधव देशाचे नाव गाजवायला निघाला आहे. त्याचे पालक आजही तरडे गावात राहून शेतमजुरी करतात तर बहिणी शिक्षण घेत आहेत.
आई-वडीलच खरे चॅम्पियन
अत्यंत खडतर परिस्थितीतून वाटचाल करताना प्रवीण जाधवचे पालक त्याच्या पाठीमागे ठाम उभे राहिले. पहायला गेले तर तेच खरे चॅम्पियन आहेत, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. 'काय, कसे काय' असे मराठीमध्ये प्रवीणची चौकशी करत पंतप्रधानांनी प्रवीण जाधव व त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. अॅथलेटिक्ससाठी निवड झालेला प्रवीण जाधव आज ऑलम्पिकमध्ये तिरंदाजीत देशाचे प्रतिनिधित्व करायला निघाला आहे. हे कसे घडले, असा प्रश्न करून प्रवीणकडून पंतप्रधान मोदी यांनी त्याचा प्रवास जाणून घेतला.
थोडे प्रयत्न केले तर पुढे जाऊ शकतो
कसोटीचा प्रसंग आला त्यावेळी इथेच हार मानून मी मागे फिरलो तर आत्तापर्यंतच्या कष्टावर पाणी फिरेल. त्यापेक्षा अजून थोडे प्रयत्न केले तर मी पुढे जाऊ शकतो या विचारणे माझा आत्मविश्वास वाढवला, अशी प्रतिक्रिया प्रवीण जाधवने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना व्यक्त केली.
प्रवीणसाखेच त्याच्या बहिणीही देशासाठी योगदान देतील
मजुरी करून आम्ही प्रवीणला शिकवले. त्याने आमचे नाव मोठे केले. आज तो देशाचे नाव जगापुढे मोठे करायला निघाला आहे. त्याच्यासारखाच त्याच्या बहिणीही देशासाठी योगदान देतील, असा आत्मविश्वास प्रवीणचे आई संगीता व वडील रमेश यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - एसईसीसी डेटा 99 टक्के त्रुटीरहित; फडणवीसांकडून सभागृहाची दिशाभूल - पृथ्वीराज चव्हाण