कराड (सातारा) - कोविडची लागण झाल्यानंतर लवकरात लवकर पिनाकचा ( Pinak Treatment For Omicron ) उपचार घेतल्यास ओमायक्रॉनच नव्हे तर आणखी कितीही म्युटेशन्स झाली तरी कोविड पूर्णपणे बरा होईल, असा दावा पुण्याच्या ससून रूग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आणि पिनाक औषधाचे संशोधक डॉ. पी. एस. पवार ( Dr PS Pawar On Omicron ) यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे. दोन वर्षात कोविड रूग्णांवरील पिनाक गोळीची चाचणी यशस्वी ठरली आहे. कोविडचे अनेक रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तसेच ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट वेगाने पसरत असला तरी त्यावरही पिनाक हे प्रभावी औषध असल्याचे डॉ. पवार म्हणालेत.
- विषारी एस प्रोटीन पिनाकमुळे होतो नष्ट -
डॉ. पवार म्हणाले, कोविडवर पिनाक गोळीची चाचणी यशस्वी होईल का, यावर आम्ही सुरूवातीला विचार केला. त्यानंतर 2020मध्ये नवले वैद्यकीय महाविद्यालयात पिनाक या गोळीची कोविड रूग्णांवर चाचणी घेतली. त्यामध्ये पिनाक गोळीचा कोविड रूग्णाला गुण येत असल्याचे लक्षात आले. कोविड 19 व्हायरसचे चार प्रोटीन असतात. त्यातील एन प्रोटीन, ई प्रोटीन आणि एम प्रोटीन, या तीन प्रोटीनमुळे प्रत्यक्ष आजार होतो. या तिन्ही प्रोटीनभोवती चरबीयुक्त थर असतो. त्यामुळे कोणत्याही औषधाचा परिणाम कोविड व्हायरसवर होत नाही. सर्पदंशावर पिनाक गोळीची चाचणी घेताना असे आढळले की, सर्पदशांत विषारी प्रोटीन्स असतात. पिनाक गोळी दिल्यानंतर बारा मिनिटात सर्पदंशातील विषारी प्रोटीन नष्ट होतात. ही बाब लक्षात घेता कोविडचे चौथे एस प्रोटीन ज्याला व्हायरसचे हात म्हणतात आणि जेणेकरून हा प्रोटीन शरीरातील पेशींना पकडतो. तसेच व्हायरसचे मल्टिप्लिकेशन (गुणाकार) होऊन आजार वाढत जातो. हे सर्व पाहता सर्पदंशावर प्रभावी ठरलेली पिनाक गोळी त्या एस प्रोटीनला नष्ट करणार, याची आम्हाला खात्री झाली. त्यामुळे कोविड रूग्णावर या गोळीची चाचणी केली असता कोविड रूग्ण ठणठणीत बरे झाले. पिनाक गोळी एस प्रोटीन ताबडतोब नष्ट करत असल्याचे सिद्ध झाले आणि पिनाकची पुणे येथील चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली, असेही ते म्हणाले.
- ओमायक्रॉनबद्दल भीती बाळगू नका -
सध्या जगभरात ओमायक्रॉन हा कोविडचा नवा व्हेरियंट आढळला आहे. या ओमायक्रॉनबद्दल सर्वत्र वेगवेगळी चर्चा सुरू आहे. नवा व्हेरियंट धोकादायक आहे. तो वेगाने पसरतो, असे म्हटले जात आहे. ओमायक्रॉन कदाचित वेगाने पसरतही असेल. पण, कोविड 19 ला कसल्याही प्रकारची म्युटिशन्स झाली आणि जर पिनाक औषधाचा उपचार घेतला तर पिनाकमुळे कोविड ताबडतोब नष्ट होईल, असे डॉ. पी. एस. पवार यांनी सांगितले. एस प्रोटीन हे विषारी प्रोटीन आहे. प्रोटीनचा आकार कसा आहे, हे महत्वाचे नाही. म्युटेशनमध्ये प्रोटीनचा आकार बदलतो. पिनाक गोळी ही एस प्रोटीनच समूळ नष्ट करते. त्यामुळे कोविडच्या व्हायरसला पेशींमध्ये जाताच येत नाही. त्याचे मल्टिप्लिकेशन होत नाही. तसेच हा व्हायरस शरीरातून बाहेर फेकला जातो. कोणीही ओमायक्रॉनच्या व्हायरसबद्दल भीती बाळगू नये. कोविडची लागण झाल्यानंतर लवकरात लवकर पिनाक गोळीचा वापर केला तर ओमायक्रॉनच नव्हे तर आणखी कितीही म्युटेशन्स झाली तरी कोविड हा पिनाकमुळे नष्ट होणारच, असेही डॉ. पवार म्हणाले.
- पिनाकमुळे पाच दिवसांत धोका टळला -
चार्टर्ड अकौटंट अमोल जोगळेकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर 2019 मध्ये पुण्यात असताना मी आणि मुलगा पॉझिटिव्ह आलो होतो. त्यावेळी तातडीने आम्ही डॉ. पी. एस. पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ताबडतोब आम्हाला पिनाकची ट्रिटमेंट सुरू केली. पिनाक गोळीबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती. पण, डॉक्टरांवर आमचा आणि डॉक्टर पवार यांचा पिनाकवर विश्वास होता. पिनाकची ट्रिटमेंट सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी बरे वाटू लागले. पाच दिवसांनी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आणि आम्ही कोरोनामुक्त झालो. त्यानंतर जून 2021 मध्ये 85 वर्षांच्या माझ्या आईला आणि 92 वर्षांच्या वडीलांना कराडमध्ये कोरोनाची लागण झाली. पिनाक गोळीवर आमचा विश्वास बसला होता. त्यामुळे आई-वडीलांना आम्ही पिनाकची ट्रिटमेंट सुरू केली. त्यानंतर दोघेही यशस्वीरित्या कोरोनामुक्त झाल्याचे जोगळेकर म्हणाले.
- पिनाक औषधामुळे दोन दिवसात फरक पडला -
कोल्हापूरचे रहिवाशी प्रकाश पाटील यासंदर्भात बोलताना म्हणाले की, कोल्हापूरमध्ये असताना मे महिन्यात मी आजारी पडलो. एचआरसीटी चाचणी केली असता माझा स्कोअर कमी होता. त्यामुळे डॉक्टरांनी मला रूग्णालयात अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मात्र, मी कराडमधील नातेवाईकांच्या सल्ल्याने कराडला आलो. डॉ. पी. एस. पवार यांच्या पिनाक औषधाचा उपचार सुरू केला. दर सहा तासाने दोन गोळ्या घेत होतो. सुरूवातीचे गोळ्यांचे दोन डोस घेतल्यानंतर त्याच रात्री बरे वाटायला लागले. पिनाक औषधाचा उपचार सुरू ठेवल्यानंतर तब्येतीत सुधारणा होत गेली. सहा दिवस औषधाचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मला पूर्णपणे बरे वाटायला लागले. श्वास घेता येऊ लागला. तसेच तोंडाला चव आली. त्यामुळे पिनाक हे औषध कोरोनावर खूपच प्रभावी ठरल्याचे ते म्हणाले.
- कराडच्या पोलिसांनीही घेतला पिनाकचा उपचार
कराड शहर पोलीस ठाण्यातील अनेक कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील पिनाकचा औषधोपचार घेतला. पिनाकच्या उपचाराने लवकर आराम मिळाल्याचे तसेच कोरोनामुक्त झाल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.