सातारा - पोहण्यासाठी गेल्यानंतर नदीपात्रात बुडालेल्या सुरेश बंडू होगले या ऊसतोड मजुराच्या मृतदेहाचा शोध शोधणाराचाही बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोरेगावमधून समोर आली आहे. दत्तात्रय बाबासाहेब बर्गे, असे मृताचे नाव आहे. ते चांगले जलतरणपटू होते. या घटनेने कोरेगाववर शोककळा पसरली आहे.
ऊसतोड मजूर वसना नदीत बुडाला - कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी परिसरात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आल्या आहेत. एका टोळीतील सुरेश बंडू होगले हा मजूर पोहण्यासाठी गेल्यानंतर वसना नदीवरील बंधाऱ्यात बुडाला. अन्य मजुरांनी शोध घेऊनही त्याचा मृतदेह सापडला नाही. म्हणून पोलिसांनी कोरेगावमधील पट्टीचे पोहणारे दत्तात्रय बर्गे यांना बोलावले. बुडालेल्या मजुराचा शोध घेताना त्यांचाही नदीपात्रात बुडून मृत्यू झाला.
कुटुंबियांचा पोलीस ठाण्यात ठिय्या - दत्तात्रय बर्गे यांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह कोरेगाव ग्रामीण रूग्णालयात आणून ठेवला. कुटुंबीयांना न कळविताच पोलीस निघून गेले. एका परिचारिकेने कळविल्यानंतर बर्गे कुटुंबिय रूग्णालयात आले. घटना घडल्यानंतर पोलिसांनी का कळविले नाही, असा जाब विचारत नागरीकांसोबत कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मारला. यामुळे कोरेगाव शहरात दुपारपर्यंत तणाव होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बर्गे कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.