सातारा - परळी खोऱ्यातील दुर्गम डोंगरावर असलेल्या रेवंडे गावाजवळ, डोंगरकडा कोसळून रस्ता बंद झाला आहे. पर्यायी रस्त्याने जाताना खाच-खळग्यांमुळे गर्भवती महिलेचे अर्भक पोटातच दगावले. प्रशासन मदतीला धावेल या आशेवर ग्रामस्थ मागील चार दिवस वाट पहात आहेत. मात्र, ना विचारपूस करायला आले आणि ना कोणी रस्त्यात पडलेल्या भल्यामोठ्या शिळा हलवायला आले. कुंभकर्णीय झोपेत असलेले जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींना आणखी किती बळी हवेत, असा सवाल रेवंडे ग्रामस्थ विचारत आहेत.
रेवंडे हे सातारा तालुक्याच्या पश्चिमेला, परळी खोऱ्यातील एक दुर्गम गाव आहे. या गावची अभिलेखावर लोकसंख्या सुमारे साडेसात हजार असली तरी बहुतांश मंडळी पोटापाण्याच्या निमित्ताने पुणे-मुंबई-सातारा येथे राहतात. तीनशे ते साडेतीनशे लोक गावात राहतात. भात, नाचणी, वरी ही येथील मुख्य पिके आहेत. जंगली जनावरांपासून पिकाची राखण, छोटे-मोठे काम करत ते आपल्या कुटुंबाची गुजराण करतात.
- सुदैवाने जीवित हानी टळली
साताऱ्यापासून सुमारे 16 किलो मिटर अंतरावर, पोगरवाडी-आरे-दरेच्या पुढील डोंगरात हे गाव वसले आहे. या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे दोन किलोमिटर आधी 17 ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास साताऱ्याला कामावर निघालेल्या युवकांना कडा कोसळून घाटरस्ता बंद झाल्याचे निदर्शनास आले. मागील आठवड्यात झालेल्या मोठ्या अवकाळी पावसात हा कडा कोसळला. वेळ मध्यरात्रीची असल्याने सुदैवाने जीवित हानी टळली.
- सुमारे 10 फुट खोल रुतल्या डोंगरी शिळा
कड्यावरून ढासळलेला डोंगराचा भाग इतका मोठा व उंचीवरुन आदळला होता की डांबरी रस्ताच्या सुमारे 8 ते 10 फुट खोल या शिळा रुतून बसल्या होत्या. या शिळा व इतर दरड, राडारोडा हटवणे आधुनिक यंत्रसामग्रीशिवाय शक्यच नव्हते. त्यामुळे कामावर निघालेली मंडळी परत मागे फिरली. गेले चार दिवस रेवंडेकडे जाणारा रस्ता तसाच बंद अवस्थेत आहे.
- पर्यायी मार्ग कच्चा अन ओबडधोबड
गावातील युवक सतीश घोलप यांनी सांगितले, रेवंडे गावात जाण्यासाठी एक पर्यायी मार्ग आहे. तो सज्जनगड-बोरणे-राजापुरी-वावदरे असा दूरचा वळसा घालून रेवंडेला जातो. या रस्त्यामार्गे साताऱ्यापर्यंतचे अंतर 23 किलोमिटरने वाढते. तसेच हा रस्ता कच्चा व ओबडधोबड आहे.
- उदरातचे थांबले बाळाचे ठोके
रेवंडेचे माजी पोलीस पाटील जयसिंग भोसले यांची सून 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. तिला प्रसवकळा सुरू झाल्याने खासगी वाहनातून वावदरे-सज्जनगडमार्गे साताराच्या सरकारी रुग्णालयात नेले. मात्र, हा रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे वाहन पोहोच्यास उशीर झाला. अखेर उदरातील बाळाचे ठोके थांबले असल्याने बाळ दगावल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
- किती दिवसा पाहणार ग्रामस्थांचा अंत..?
रस्ता बंद होऊन चार दिवस उलटले. अजून कोणीही इकडे फिरकले नाही. शासन आणखी किती दिवस ग्रामस्थांचा अंत पाहणार आहे, असा सवाल रेवंडे ग्रामपंचायतीचे सदस्य सीताराम भोसले यांनी केला.
- तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही
रेवंडे गावासाठी हा एकच चांगला मार्ग होता. मात्र, डोंगर कडा कोसळल्याने हा मार्गही ठप्प झाला आहे. डोंगरकड्यावरुन ज्या शिळा पावसामुळे रस्त्यात रुतल्या त्या यंत्राशिवाय काढता येत नाही. घटना घडून तीन-चार दिवस झाले मात्र एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी फरकला नाही. यामुळे दळणवळणच बंद झाले आहे. जर वेळीच सोय झाली नाही तर आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हेही वाचा - महाबळेश्वर-पाचगणीत घोडेस्वारी अन् नौका विहारासाठी सशर्त परवानगी