सातारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजारावर गेला आहे. तसेच, फलटण तालुक्यातील रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर फलटण येथील अत्याधुनिक असणारे निकोप रुग्णालय प्रशासनाकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी अधिग्रहित करण्यात आले. मात्र, त्यामुळे इतर आजार असणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत असल्याची तक्रार रुग्णांकडून होत आहे.
कोरोना सोडून इतर आजार असणाऱ्या रुग्णांची प्रशासनाकडून कोणतीही सोय होत नसल्याने रुग्ण आणि नातेवाईक संतप्त झाले आहेत. तालुक्यातील इतर आजार असलेल्या रुग्णांना उपचारासाठी निकोप रुग्णालयात ताटकळत उभे राहावे लागते आहे. त्यामुळे, संतप्त झालेल्या रुग्णांची आणि पोलिसांची रुग्णालयाबाहेर शाब्दीक चकमक झाली.
या रुग्णालयाने आधीच कोरोनाच्या रुग्णांसाठी ४० खाटांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, असे असताना देखील प्रशासनाने हे रुग्णालय अधिग्रहित केले. याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांकडूनसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेर विचार करावा, अशी मागणी डॉक्टारांनी केली आहे.
हेही वाचा- पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणाचे दरवाजे बंद; 95.79 टीएमसी पाणीसाठा