सातारा - जिल्हा सरकारी रुग्णालयातील 63 वर्षीय कोरोना संशयिताचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या रुग्णाचा 15 व्या दिवसानंतरचा दुसरा रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यू कशामुळे झाला होता, हे स्पष्ट होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात सर्वात आधी दाखल 2 कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी 63 वर्षीय व्यक्तिचा आज पहाटे मृत्यू झाला. या संदर्भात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी अधिकृतपणे माहिती दिली.
मृत 63 वर्षीय रुग्णाविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रुग्ण सकाळी बाथरुमला जाताना खाली कोसळून त्याची तब्येत अचाणक बिघडली होती. त्यानंतर रूग्णावर फिजीशियन यांनी सर्वोतोपरी उपचार केले. परंतु, या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असावा, असा उपचार करणाऱ्या फिजीशियन यांचा प्राथमिक अंदाज आहे.
या रुग्णाच्या घशातील स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आहे. सातारा जिल्ह्यातील पहिल्या 2 कोरोना बाधितांपैकी हा एक रुग्ण होता. रविवारी या रूग्णाचा 14 दिवसांनंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. साताऱ्यातील 1 व कराडचे 7 अशा 8 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच बाधित रुग्णाच्या सहवासा असणाऱ्या 9 जणांना जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असल्याचे शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांनी सांगितले.