कराड (सातारा) - भारताचे माजी उपपंतप्रधान, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण ( Yashwantrao Chavan Birth Anniversary ) यांच्या जयंतीनिमित्त कराडच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी मान्यवरांनी आज अभिवादन केले.
यावेळी सहकार व पणन मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती व तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विकासाला दिशा दिली. महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे गेला पाहिजे. राज्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे, यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचाराने आज राज्याची वाटचाल सुरू आहे. दरम्यान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथून आलेल्या 'यशवंत ज्योती'चे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील व मान्यवरांनी स्वागत केले.