सातारा- कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा व्हावा या हेतूने अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या महिना अखेरपर्यंत प्लांट सुरु होईल अशी माहिती कारखान्याचे संचालक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
हवेतून ऑक्सिजनची निर्मिती
अजिंक्यतारा कारखान्याने विविध उपक्रमांतून सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. महाराष्ट्रासह परराज्यातील पुरग्रस्तांना मदत, दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा अशा विविध उपक्रमांद्वारे कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. सध्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारा प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती भोसले यांनी दिली आहे.
महिनाखेर सुरू होणार प्लांट
अजिंक्यतारा कारखान्यावरील या प्लांटमध्ये हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्लांटच्या माध्यमातून 24 तासांत प्रत्येकी 12 किलोचे 90 ऑक्सिजनचे सिलिंडर भरले जाणार आहेत. वैद्यकीय सेवेसाठी उत्पादित केला जाणाऱ्या या ऑक्सिजनची शुद्धता ९६ टक्के असणार आहे. येत्या महिना अखेरीस हा प्लांट सुरु होणार असून, याचा फायदा जिल्ह्यातील रुग्णालयांना होणार आहे.
हेही वाचा - चिंताजनक! कोरोनाबरोबर 'म्यूकरमायकोसिस'चे संकट गडद; सात जणांनी गमावले डोळे