सातारा - पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि पुढील 5 वर्षात दक्षिण-कराडमध्ये प्रचंड विकास केला. त्यांच्यासारख्या नेत्याची विधानसभेत गरज आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळेच त्यांचा विरोधकांवर धाक आहे, असे वक्तव्य आमदार विश्वजित कदम यांनी केले आहे. तसेच या मतदारसंघात धनशक्ती विरूद्ध जनशक्ती, असा सामना आहे. त्यामुळे तात्पुरत्या आमिषाला बळी न पडता जनशक्तीच्या माध्यमातून धनशक्तीचा पराभव करण्याचे आवाहनही आमदार कदम यांनी केले. कदम हे कडेगाव-पलूस मतदारसंघाचे आमदार आहेत.
हेही वाचा - पवारसाहेबांचे सर्व दात पडले असून; आता फक्त सुळेच शिल्लक, गीतेंची बोचरी टीका
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत महाआघाडीचे उमेदवार श्रीनिवास पाटील आणि दक्षिण-कराडचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन डॉ. इंद्रजीत मोहिते, रघुनाथराव कदम, इंद्रजीत चव्हाण, शोभाताई सुतार, वसंतराव निकम, माणिकराव जाधव उपस्थित होते.
हेही वाचा - भाजपचे बंडखोर उमेदवार म्हणतात.. तुम्ही मला मत देणार आहात की मुलगी!
दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या दक्षिण-कराडमध्ये रूजलेल्या विचाराला वेगळे वळण लागू नये, याची जनतेने खबरदारी घेतली पाहिजे. यशवंतराव मोहिते यांनी या मतदार संघाची बांधणी केली. मागील 10 वर्षात पृथ्वीराज चव्हाणांनी ती बांधणी कायम ठेवली, असेही कदम म्हणाले. तसेच लोकसभा पोटनिवडणुकीचा त्यांनी जनतेसाठी त्याग केला. यावेळी मतदारसंघात जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, असा संघर्ष आहे. त्यामुळे लोकांनी तात्पुरत्या आमिषाला बळी पडू नये. तर पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील या दोन ताकदीच्या नेत्यांना जनतेने साथ द्यावी, असे आवाहन केले.