सातारा - पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. केवळ तेवढेच न करता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सोईसाठी ग्रेड सेपरेटर वाहतुकीसाठी तत्काळ खुला करा, अशा सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.
पोवई नाका ते वायसी कॉलेज मार्गावरील काम प्रगतीपथावर
पोवई नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे (समतल विलगक) काम सुरू आहे. राजपथावरुन मध्यवर्ती बस स्थानक, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाचे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. पोवईनाका ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय (वायसी कॉलेज) या मार्गावरील काम प्रगतीपथावर आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीसाठी खुले करणे अत्यावश्यक आहे. ग्रेड सेपरेटरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचे डांबरीकरण सध्या सुरू आहे. मात्र ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरू नसल्याने या रस्त्यांवर वाहतुकीचा ताण पडत आहे. वाहनांची मोठी कोंडी होत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रेड सेपरेटरची चर्चा सुरू आहे. मात्र, तो वाहतुकीसाठी खुला कधी होणार? याची उत्सुकता सातारकरांमध्ये आहे.
पूर्ण झालेल्या मार्गावरुन वाहतूक सुरू करण्याच्या सूचना
सातार्यात ग्रेड सेपरेटर आहे हेच सातारकर विसरतील, अशी अवस्था आता झाली आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटर तातडीने वाहतुकीसाठी खुला केला पाहिजे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सूचना केल्या आहेत. पूर्ण झालेल्या मार्गावरुन वाहतूक तत्काळ सुरू करा आणि उर्वरीत कामही तातडीने पूर्ण करुन ग्रेड सेपरेटर लोकांच्या सेवेत रुजू करा, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सांगितले.
हेही वाचा - मराठा आरक्षण प्रश्न लोंबकळत राहिला याला जबाबदार कोण - उदयनराजे भोसले
हेही वाचा - साताऱ्यातील जबरी चोरी उघड : दोघांची कोठडीत रवानगी