सातारा - जिल्ह्यातील सुमारे 30 हजार अन्नपदार्थांच्या दुकानांसाठी केवळ 7 अन्न सुरक्षाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यातील केवळ 5 कार्यरत असून, हे अधिकारी 30 हजार दुकानांवर कसे लक्ष ठेवणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या दुकानांमधली अन्न सुरक्षा रामभरोसेच असल्याचे दिसून येत आहे.
'एक्सपायरी' आणि 'बेस्ट बीफोर' यातील फरक
जागतिक ग्राहक दिनानिमित्त 'ई टीव्ही भारत'ने पॅकेज्ड फूड प्रॉडक्टची विक्री करणाऱ्या दुकानांतील कालबाह्य झालेल्या उत्पादनांच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली. पॅकेज्ड फूड प्रॉडक्टवर उत्पादनाची तारीख नमूद असते तसेच 'एक्सपायरी डेट' अथवा 'बेस्ट बिफोर युज' ही तारीखही नमूद असते. एक्सपायरी डेट म्हणजे मालाच्या उत्पादनाच्या तारखेपासून विशिष्ट दिवसांनी ते उत्पादन वापरण्या योग्य राहत नाही. त्यामुळे एक्सपायरी डेट झालेल्या अन्नपदार्थाची कायद्यानुसार विक्री करता येत नाही. 'बेस्ट बिफोर युज' या दुसऱ्या प्रकारामध्ये विशिष्ट दिवसानंतर त्या उत्पादनाची गुणवत्ता कमी होते. असा अन्नपदार्थ फारसा हानीकारक नसला तरी तो दुकानदाराला विकता येत नाही.
2 लाखांपर्यंत दंड
साताऱ्यातील सहाय्यक संचालक अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्नसुरक्षा अधिकारी अनिल पवार 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले की, एक्सपायरी डेट अथवा 'बेस्ट बीफोर'ची तारीख उलटलेल्या अन्नपदार्थाची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. तसे आढळल्यास संबंधित दुकानदाराला दोन लाखापर्यंत दंड होऊ शकतो. अन्न आणि औषध प्रशासनातर्फे अन्न सुरक्षा अधिकारी वेळोवेळी अशा दुकानांची तपासणी करत असतात. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते.
1972 ची पदसंख्या कायम
उपलब्ध माहितीनुसार राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न विभागात 1972 सली 272 अन्न सुरक्षा अधिकारी (अन्न निरीक्षक) होते. आज 49 वर्षांनंतरही त्यांची संख्या 272 च आहे. दरम्यानच्या काळामध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे, दुकानांची संख्या देखील वाढली आहे. मात्र अधिकाऱ्यांची संख्या त्या प्रमाणात वाढवण्यात आली नाही. सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये सुमारे 30 हजार अन्न व्यावसायिक आहेत. त्यांच्यासाठी येथील सहाय्यक आयुक्त कार्यालयात सात अन्न सुरक्षा अधिकारी असून, त्यापैकी दोन रजेवर असल्याने केवळ 5 अधिकार्यांवर अन्नसुरक्षा कार्यालयाचे कामकाज चालते. कामाचा वाढता ताण, न्यायालयीन तारखा, दुकानदारांना नोटिसा, वरिष्ठ सभागृहातील प्रश्नांवर माहिती पुरवणे आदी व्याप लक्षात घेता हे मनुष्यबळ प्रचंड अपुरे आहे.
'तो' तर ग्राहकांचा हक्क
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे माजी जिल्हाध्यक्ष मोहन कुलकर्णी यांनी सांगितले की "बिस्कीटे, नुडल्स सारखा वेस्टन असलेला खाद्यपदार्थ उत्पादनाची तारीख व एक्सपायरी डेट पाहूनच खरेदी करणे ग्राहकांच्या हिताचे आहे. मुदतबाह्य माल खरेदी करू नये. कोणताही माल नाकारण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. चुकून अशा पदार्थाची खरेदी झाल्याचे लक्षात आल्यानंतर ती वस्तू दुकानदाराला परत करण्याचा ग्राहकाला अधिकार आहे. असा माल परत घेणे दुकानदारावर बंधनकारक आहे." एखादा दुकानदार स्वीकारत नसेल तर ग्राहक न्यायमंचाकडे तक्रार करता येते. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाकडे ही तक्रार करून ग्राहकांनी स्वतःच्या हक्काचे संरक्षण करावं, असे आवाहनही यावेळी कुलकर्णी यांनी केले.
कालबाह्य उत्पादने नष्ट करतो
लॉकडाउनच्या काळात काही माल आमच्याकडेही शिल्लक राहिला होता. मात्र आम्ही एक्सपायरी डेट तपासून असा कालबाह्य माल संबंधित वितरकाला परत केला आहे. काही उत्पादने कालबाह्य झाल्यानंतर बदलून दिली जातात, तर काही वितरक अशी सुविधा देत नाहीत. अशावेळी कालबाह्य उत्पादन आम्हीं नष्ट करतो, असे शुक्रवार पेठेतील आनंद फुड्सच्या संचालक पूर्वा काळे यांनी सांगितले.