सातारा - येथील माण तालुक्यातील पळशी येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात कांदा कुजल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. परिसरातील नुकसानीचे सरकारने पंचनामे केले आहेत. मात्र, मदत कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा- कोश्यारी पहिलेच नाहीत.. यापूर्वीही राज्यपालांचे अनेक निर्णय ठरले वादग्रस्त
पावसाने ओढ दिल्याने खरिपातील हंगाम वाया गेला तर अनेकांनी पाऊस नसल्याने पेरण्याच केल्या नव्हत्या. ऑगस्ट व सप्टेंबर महिना कोरडाच गेल्याने खरीप हंगामात कोणतेही पीक हाती लागले नाही. तर काहींनी पावसाच्या आशेवर कांदा हे नगदी पीक घेतले होते. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी ही पिके कशीतरी जगवली. पण, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे शेतात पंधरा ते वीस दिवस पाणी साठुन राहिल्याने कांदा जमिनीतच कुजून गेला. शेतकऱ्याच्या खिशाला आधार देणारे कांदा हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरवर्षी प्रत्येक हंगामात परिसरातून जवळपास तीनशे ते चारशे हेक्टर कांदा पीक घेतले जाते. मात्र, मागील तीन वर्षांपासून सलग दुष्काळ पडल्याने उत्पन्न घटत चालले आहे. शेती करणे अवघड झाले आहे. तर ऑक्टोबर महिन्यात सलगपणे झालेल्या जोरदार पावसाने कसेतरी जगलेले पीक शेतातच कुजून गेले.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसला आहे. उभ्या पिकात नांगर घालण्याशिवाय पर्याय नसल्याने येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षी कांद्यास चांगला दर मिळत असूनही कांदा शेतातच कुजल्याने शेतकऱ्यातून चिंता व्यक्त होत आहे. खरीप हंगामात पदरी काहीही पडले नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी कशी करायची? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. तर उधारी, उसनवारीने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. डोक्यावर कर्जाचे ओझे वाढत असल्याने चिंता निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतात कांदा कुजल्याने परिसरातील शेतकरी उभ्या पिकात ट्रॅक्टर रोटाव्हेटर फिरवत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. परिसरातील नुकसानीचे शासनाने पंचनामे केले आहेत. मात्र, मदत कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.