सातारा - जिल्हा बंदी उल्लंघन करून सातारा जिल्ह्यात आलेले एस बँक आर्थिक घोटाळयातील आरोपी वाधवान यांचा १४ दिवसांचा इन्स्टिटयुशनल क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे. सर्वांना पुढील १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाचा राजकीय रंग दिल्लीपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणाबाबत स्थानिक अधिकारी कोणतीही माहिती देत नसल्याचे समोर येत आहे. ८ मार्चला वाधवान बंधु यांनी लोणावळा सोडून महाबळेश्वर येथील आपल्या ‘दिवान विला’ या बंगल्यात येण्याचा निर्णय घेतला. येताना वाधवान बंधु यांनी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेतले, या पत्रामुळे वाधवान बंधु यांचा लोणावळा ते महाबळेश्वर हा प्रवास सुकर झाला असला तरी वाधवान बंधु यांना प्रवासासाठी पत्र देणे हे गुप्ता यांच्या चांगलेच अंगलट आले.
या प्रकरणात गृह विभागचे प्रधान सचिव यांना राज्य शासनाने सक्तीच्या रजेवर पाठविल्याने जिल्ह्यातील सर्वच अधिकारी यांनी या प्रकरणाचा धसकाच घेतला आहे. महाबळेश्वर येथील इन्स्टिटयुशनल क्वारंटाईन कक्ष प्रमुख असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील, पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांचेकडे या प्रकरणाची माहिती विचारली असता सर्वांनी माहिती देण्याबाबत असमर्थता व्यक्त करून वरीष्ठांकडून याबाबत कोणतेही आदेश आम्हाला आले नाही. त्यामुळे वाधवान यांच्या कस्टडीबाबत आम्हाला काहीही माहीत नाही, असे उत्तर दिले.