सातारा - फलटण तालुक्यात विंचवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात येथील संशोधकांना यश मिळाले आहे. आतापर्यंत भारतात या कुळातील चारच जातींची नोंद होती. त्यात नव्या जातीची भर पडली आहे. निओस्कॉरपिओपस फलटणेंनसीस (Neoscorpiops phaltanensis) असे या जातीचे नमकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा विंचू फलटण सोडून भारतात इतरत्र कोठेही आढळत नाही.
नवीन जातीच्या संशोधनाचा शोधनिबंध बीएनएचएस (BNHS) या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रसिद्ध झाल्याने त्यावर मान्यतेची मोहर उमटली आहे. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटी या संस्थेचे प्रमुख डॉ. अमित सय्यद, अभिजीत नाळे, सचिन जाधव, मंगेश कर्वे, अभिजीत निकाळजे, अफजल खान, किरण अहिरे, आणि ऋषीकेश आवळे तसेच 'इन हर' या संस्थेचे शौर्री सुलाखे, आनंद पाध्ये, देशभुषण बस्तावडे, निखिल दांडेकर या संशोधकांनी संयुक्तपणे हे यश मिळवले आहे.
हेही वाचा - देशात 99 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 1 हजार 302 जणांना लागण
सातारा जिल्ह्यात असणारी जैवविविधता अभ्यासण्यासाठी डॉ. अमित सय्यद यांनी 2008 मध्ये सुरुवात केली. या अभ्यासा दरम्यान त्यांना ही विंचवाची नवीन प्रजात असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड रिसर्च सोसायटीच्या सदस्यांनी फलटण तालुक्यात संशोधनाचे काम सुरू केले. फलटणमध्ये फक्त असराई देवीच्या डोंगर कपारीमध्ये हा विंचू आढळतो. विंचवाच्या कुळातील फक्त चार जाती भारतामध्ये आढळत होत्या.
या नवीन विंचवाचा शोध लागल्यामुळे त्यात आणखी या नव्या प्रजातीची भर पडली आहे. 'निओस्कॉरपिओपस फलटणेंनसीस' असे या जातीचे नाव फलटण या भागावरून ठेवण्यात आले आहे. 'या नवीन जातीच्या शोधामुळे जैवविविधतेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने ही त्याचे जतन करण्यास महत्त्व दिले पाहिजे', अशी अपेक्षा डॉ. अमित सय्यद यांनी 'इटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.