सातारा - राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुणाळी सुरू आहे. 21 तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. याच बरोबर जिल्ह्यात सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले. गुरुवारी या दोन्ही निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. लोकसभा निवडणुका होऊन तीन महिन्यात राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या ठिकाणी तीन महिन्यातच पोट निवडणूक घेण्यात आली. या ठिकाणी भाजपकडून उदयनराजे तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील मैदानात आहेत. आता या लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आपले वर्चस्व कायम ठेवणार की रयतचे मताचे दान उदयनराजेंच्या पारड्यात पडणार हे पाहण्यासाठी अवघा महाराष्ट्र उत्सुक आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एकूण 67.15 टक्के मतदान झाले आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कराड उत्तर, सातारा, कोरेगाव, वाई या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले होते. तर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे आणि पाटणमध्ये शिवसेनेचे वर्चस्व होते. सध्य स्थितीत सातारच्या दोन्ही राजांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या ठिकाणी राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच उदयनराजे समर्थकही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा फटका बसणार की त्यांचे मत राष्ट्रवादीच्या विचारसरणीला मिळणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांचे समर्थकही पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करीत आहेत. श्रीनिवास पाटील यांच्या समर्थकांच्या मते, विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना एक ते सव्वा लाख मतांचे मताधिक्य मिळेल. याशिवाय, कोरेगाव आणि वाई मतदारसंघातून ही प्रत्येकी 15 ते 20 हजारांचे मताधिक्य मिळेल.
सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांची ताकद वाढली आहे. असे असले तरी, श्रीनिवास पाटील यांचे हे सव्वा ते दीड लाखाचे मताधिक्य उदयनराजे यांना सातारा मतदारसंघातून तुटणार नाही आणि श्रीनिवास पाटील यांचा सहज विजयी होईल, असा विश्वास तेथील कार्यकर्त्यांना आहे.
लोकसभा पोट निवडणुकीचे मतदान पार पडताच साताऱ्यात सर्व जागांवर युतीचे उमेदवार निवडून येतील, असा दावा उदयनराजे यांनी केला आहे. तसेच मला ओव्हर कॉन्फिडन्स नाही तर विजयी होण्याचा कॉन्फिडन्स असल्याचेही ते म्हणाले होते.
दरम्यान, साताऱ्यात उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदींसह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, भाजपसाठी विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा सातारा लोकसभा मतदारसंघाची पोट निवडणूक आव्हानात्मक ठरत आहे. तसेच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भर पावसात झालेली जाहीर सभा चर्चेचा विषयी ठरली होती. या सभेने साताऱ्यातील काठावरची मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार आहेत, हे निश्चित...