कराड (सातारा) - भारतातील सर्पांविषयी समाजात अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. त्यामुळेच सर्पांचा छळ होऊन त्यांचा हकनाक बळी जातो. साप डूख धरतो. नागाच्या डोक्यावर मणी असतो. नाग पुंगीच्या तालावर डोलतो, दूध पितो, यासारख्या अनेक गैरसमजाविषयी रयत शिक्षण संस्थेच्या रयत विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. सुधीर कुंभार हे अनेक वर्षांपासून प्रबोधन करत आहेत. साप हा शेतकर्यांचा मित्र असतो. तसेच सगळेच साप हे विषारी नाहीत. त्यामुळे सापांना जगू द्या, असे आवाहन नागपंचमी सणाच्या निमित्ताने डॉ. कुंभार यांनी केले आहे.
'अनेक गैरसमज जास्त'
रयत शिक्षण संस्थेच्या कडेगाव (जि. सांगली) येथील महात्मा गांधी विद्यालयातील विज्ञान शिक्षक तसेच विज्ञान समन्वयक असलेल्या डॉ. सुधीर कुंभार यांनी सर्पांची शास्त्रीय माहिती तसेच अंधश्रद्धा आणि गैरसमज, यावर कार्टून स्लाईड शो द्वारे प्रकाशझोत टाकला आहे. सर्पाच्या डोक्यावर नागमणी असतो, पुंगीच्या तालावर नाग डोलतो, असे चित्रपटात दाखविले जाते आणि लोक त्यावर विश्वास ठेवतात. परंतु, हे निव्वळ गैरसमज आहेत. साप डूख धरतो, असे लोक मानतात. परंतु, सापाचा मेंदू हा माणसाइतका प्रगल्भ नसतो. सापाचा मेंदू फार छोटा असतो. त्याचप्रमाणे सापाला ऐकू येते, हा देखील गैरसमज मोठ्या प्रमाणात आहे. वास्तविक सापाला कान नसतात. गारूड्याच्या हातातील पुंगीच्या हालचालीनुसार नाग हालचाल करतो. त्यामुळे नाग पुंगीच्या तालावर डोलतो, हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. साप हा सस्तन प्राणी नाही. त्यामुळे सापाच्या अंगावर केस असतात, हा गैरसमजही लोकांनी डोक्यातून काढून टाकावा, असे डॉ. सुधीर कुंभार सांगतात.
'साप दूध पितो ही अंधश्रद्धा'
उंदीर, बेडूक हे सापांचे खाद्य असते. साप हा उंदरापासून पिकांचे रक्षण करतो. त्यामुळे सापाला शेतकर्यांचा मित्र म्हटले जाते. नागपंचमी सणादिवशी जिवंत नाग पकडून त्याची पूजा केली जाते. दूध पाजले जाते. वास्तविक साप दूध पित नाही. उलट दूध पाजण्यामुळे सापाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करून सापांविषयीची शास्त्रीय माहिती घ्यावी. रानावनातील सर्पांचे संरक्षण आणि संवर्धन करावे, असे आवाहन डॉ. सुधीर कुंभार यांनी केले आहे.
'जगात सापांच्या 300 जाती'
साप हा सरपटणारा प्राणी आहे. जगात सापांच्या 300 जाती आढळतात. त्यातील 375 साप हे विषारी आहेत. त्यामध्ये भारतात 7 जातीचे साप हे विषारी आहेत. नाग, मण्यार, घोणस, फुरसे, चापडा आणि समुद्र सर्प हे विषारी असतात. नाग आणि मण्यार सर्पाने दंश केल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होतो. घोणस, फुरसे आणि चापडा सर्पाने दंश केल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो. समुद्र सर्पांचे विष स्नायुंवर परिणाम करते. सर्पांचे विष हे मंत्राने जडीबुटीने उतरते, हा गैरसमज आहे.
विज्ञान मंडळाचे वर्षभर प्रबोधन
रयत विज्ञान मंडळ, राष्ट्रीय हरित सेना, वेपनेट क्लबच्या माध्यमातून डॉ. सुधीर कुंभार हे वर्षभर जनजागृती मोहीम राबवितात. सर्पांविषयी गैरसमज, फटाक्यांचे प्रदूषण, गणेशोत्सवातील प्रदूषण, ओझोन दिन, वणवा निर्मुलन मोहीम, होळीचा सण, यासंदर्भात कार्टून, पोस्टर, पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमार्फत समाज प्रबोधनाची मोहीम राबविली जाते.