सातारा - साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर सापडलेल्या लोखंडी पेटीचे गुढ उकलण्यात जिज्ञासा मंचला यश आले आहे. उत्खननात सापडलेली पेटी म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्रिटिशांचे पाव आणि केक बनवण्याचे ओव्हन असल्याचे आज स्पष्ट झाले.
ब्रिटिश काळातील ही पेटी नेमकी कशासाठी वापरली जायची, पाहा एक्सक्लुझीव मुलाखत -
साताऱ्याच्या अजिंक्यताऱ्यावर मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे एक टन वजनाची लोखंडी पेटी सापडली होती. ब्रिटिश काळातील ही पेटी नेमकी कशासाठी वापरली जायची हे गुढ होते. जिज्ञासा मंचचे कार्याध्यक्ष निलेश पंडित यांनी आज 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या एक्सक्लुझीव मुलाखतीत पेटीबाबत साधार खुलासा केला. आमचे प्रतिनिधी शैलेन्द्र पाटील यांचा हा खास रिपोर्ट.
घटनेची पार्श्वभूमी
गेल्या आठवड्यात स्वच्छतेचे काम सुरू असताना राजा शिवछत्रपती परिवार या संस्थेच्या स्वयंसेवकांना मातीखाली सुमारे 11 फूट लांबीचा व 4 फूट उंचीचा जुना दगडी चौथरा तसेच जवळच मातीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे एक टन वजनाची लोखंडी पेटी सापडली होती. त्यानंतर पुरातत्व विभागाच्या निगरानीखाली रविवारी झालेल्या उत्खननात आणखी एका छोट्या पेटीचा दर्शनी भाग सापडला. ब्रिटिश काळातील ही पेटी रेल्वेची असावी किंवा काडतुसे ठेवण्यासाठी तिचा वापर झाला असेल, असे विविध तर्क व्यक्त करण्यात आले. मात्र त्याला निश्चित आधार सापडत नव्हता. त्यामुळे ती पेटी नेमकी कशासाठी वापरात होती याबाबत गुढ होते.
एक ओव्हन तर दुसरे जाळाची भट्टी
साताऱ्यातील जिज्ञासा मंच या इतिहास संवर्धन व संशोधन संस्थेचे कार्यकर्ते सापडलेल्या पेटीच्या फोटोग्राफीच्या आधारावर तज्ञांचे मार्गदर्शन घेत तर्काची साखळी जोडत गेले. काही जुने फोटोग्राफही त्यांनी तपासले. त्याआधारे ते एका निष्कर्षाप्रत पोहोचले. 'जिज्ञासा'चे कार्याध्यक्ष निलेश पंडित म्हणाले, "मोठी पेटी म्हणजे ओव्हन असून ते भिंतीमध्ये वरच्या भागात बसवले असावे. तर त्याच्या खालच्या भागात ओव्हनला जाळ घालण्यासाठी लोखंडी दरवाजा बसवला असावा.
चौथरा पीठ मिळण्यासाठीच
'किल्ल्यावर पेटीजवळच सापडलेला दगडी चौथरा हा पीठ मळण्यासाठी वापरला जात असावा. या चौथऱ्यावर कट्टा स्वच्छ केल्यानंतर पाणी नितळण्यासाठीची खोबण एका बाजूला दिसून येते' असे निलेश पंडीत यांनी स्पष्ट केले. 'किल्ल्यावर 1818 मध्ये ब्रिटिशांनी एक पलटण ठेवली होती. त्यात इंग्रज अधिकाऱ्यांसाठी केक, पाव आदी बनवण्याची सोय म्हणून सध्याच्या पडक्या वाड्याजवळ भटारखाना केला असावा. या दोन्ही पेट्या भिंतीत बसवल्या असतील. काळाच्या ओघात इमारतीच्या भिंती पडल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली या अवजड पेट्या दबल्या गेलेल्या' असा तर्कही श्री. पंडित यांनी साधार मांडला.
सातारकरांची मागणी
सध्या या दोन्ही वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या ताब्यात आहेत. अजिंक्यतारा किल्ल्यावर अधिक उत्खनन होऊन इतिहासाला उजाळा मिळावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे. 'वरिष्ठ कार्यालयाकडे यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत' असे छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.