सातारा : जिल्ह्यातील मलकापूर नगरपालिकेला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये किंमतीची सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. रुग्णवाहिकेची चावी नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाने पल्स ऑक्सिमीटर खरेदी करून कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.
मलकापूर नगरपालिकेने 9 प्रभागातील अंदाजे 37 हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये रक्तदाबाचे 1 हजार 150, मधुमेहाचे 592, इतर आजारांचे 55, साठ वर्षावरील 3 हजार 162 आणि 10 वर्षाखालील 4 हजार 230 इतके रुग्ण आढळून आले. 60 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांना नगरपालिकेमार्फत औषध किट उपलब्ध करुन देण्यात आले. तसेच ऑक्सिजन तपासणीसाठी पल्स ऑक्सिमीटरही पुरविण्यात आली. ऑक्सिजन मात्रा कमी झाल्यास संबंधित रुग्णास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
मलकापूर नगरपालिकेच्या मागणीनुसार आमदार चव्हाण यांनी स्थानिक विकास निधीतून 15 लाख रुपये किंमतीची सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध दिली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पणही आमदार चव्हाण यांच्या हस्ते झाले. तसेच नगरपालिका कर्मचारी, नगरसेवक, गजानन नागरी सहकारी पतसंस्था, मोटे इंडस्ट्रीज, संगम हॉटेल, कोयना वसाहत औद्योगिक इंडस्ट्रीज, शिवसेना कराड तालुकाध्यक्ष नितीन काशिद, केएसटी कन्स्ट्रक्शन यांनी एकूण 16 ऑक्सिजन मशिन खरेदी करून त्या नगरपालिकेकडे सुपूर्द केल्या.
रुग्णवाहिका लोकार्पण आणि 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना चव्हाण यांनी प्रत्येक कुटुंबाने पल्स ऑक्सिमीटर खरेदी करण्याचे आवाहन मलकापूरकरांना केले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी मनिषा आव्हाळे, सर्व नगरसेवक, कोविडदूत, नोडल अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्लाझ्मा संकलन केंद्र सुरू; तीन कर्मचार्यांनी केला प्लाझ्मा दान