कराड (पाटण) - मायलेकांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरात आढळून आल्याने पाटण तालुक्यातील मोरेवाडी गावात खळबळ उडाली आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ढेबेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास तपास करत आहेत. कमल लोकरे (66) आणि मुलगा सचिन लोकरे (38) रा. मोरेवाडी, ता. पाटण, अशी मृतांची नावे आहेत.
दुर्घटना की आत्महत्या हे अद्याप अस्पष्ट -
रविवारी रात्री जेवण केल्यानंतर ते झोपी गेले. सकाळी त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर मायलेकांचा जळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या घटनेची खबर ढेबेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घराची पाहणी केली असता घरातील कागदाचे पुठ्ठे आणि अंथरूण जळाल्याचे दिसले. त्यामुळे ही दुर्घटना की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सचिन लोकरे आणि त्याची आई कमल आणि त्याची आई कमल हे दोघेच घरात होते. सचिनच्या वडिलांचे पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे ते दवाखान्यात आहेत. त्यांच्या सेवेसाठी भाऊही दवाखान्यात होता. त्यामुळे रविवारी रात्री नेमके काय झाले, हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत. दरम्यान, दोन्ही मृतदेहांचे कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
हेही वाचा - मोठी घोषणा : शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने मिळणार कर्ज