कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे रविवारी 4 वाजता धरणाचे दरवाजे 10 फुटाने उचलण्यात आले आहेत. धरणाचे सहा वक्र दरवाजे आणि पायथा वीज गृहातून 54,246 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा 91.21 टीएमसी झाला आहे. धरणात 83 हजार 877 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी 2,152.07 फूट इतकी झाली आहे. रविवारी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे दरवाजे ६ फुटाने उघडण्यात आले होते. मात्र, धरणातील पाण्याची आवक पाहता पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी 4 वाजता धरणाचे दरवाजे 10 फुटांवर नेण्यात आले आहेत. वक्र दरवाजातून 52,146 आणि पायथा वीज गृहातून 2,100 क्युसेक, असा एकूण 54,246 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू झाला आहे.
धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना-कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून सांगली परिसरातील पूररेषेत येणाऱ्या लोकांना हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने पाणी पातळी नियंत्रित करण्याचे नियोजन सुरू केले आहे. धरणात होणारी पाण्याची आवक आणि पावसाचे प्रमाण पाहून धरणातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवडाभरापासून धरणातून पाणी सोडण्याबाबत प्रशासन नियोजन करत होते. मात्र पाणी पातळी योग्य पातळीपर्यंत येईपर्यंत पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला होता.तसेच दिवसा धरणातून पाणी नदी पात्रात सोडावे, असे आदेश शंभूराज देसाई यांनी यापूर्वी दिले होते.