सातारा - जिवंत घोरपड पकडल्यावर तिचा टीकटॉक व्हीडिओ करणे कोरेगाव तालुक्यातील पिंपरीच्या तिघांना महागात पडले. या व्हिडीओच्या आधारे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना जेरबंद केले आहे. यातील एक जण अल्पवयीन आहे. किशोर वसंत सोनवले (वय - 29), राजेश वसंत सोनवले (वय - 36, दोघेही रा. पिंपरी ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या तिघांनी शिकारीच्या उद्देशाने घोरपड पकडली होती. यानंतर त्यांनी हा घोरपडीचा व्हिडीओ बनवत तो टिकटॉकवर व्हायरल केला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना हा व्हिडिओ मिळाल्यानंतर त्यांनी आरोपींना अटक केली. या तिघांनीही गुन्ह्याची कबूली दिली आहे. यानंतर त्यांनी शिकार केलेले आणि मांस शिजवलेले ठिकाण अधिकाऱ्यांना दाखविले.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल, कुऱ्हाड आणि इतर साहित्य, असा अंदाजे एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई कोरेगावचे वनक्षेत्रपाल आर. एस. आटोळे, फिरत्या पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, वनपाल गजानन भोसले, दिपक गायकवाड, विजय भोसले, राम शेळके, विजय नरळे, सुहास पवार ,राजेश वीरकर यांनी केली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : स्वतःचं घरं केलंय क्वारंटाइन सेंटर, पिसादेवी गावातील तरुणाचा स्तुत्य उपक्रम
घोरपड या वन्यप्राण्यास शासनाने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे अनुसुची 1 भाग 2 मध्ये स्थान देऊन व्यापक संरक्षण दिलेले आहे. मांस खाण्याच्या लोभापायी वन्यप्राणी शिकार करण्याची अपप्रवृत्ती वाढत आहे. वन्यप्राणी शिकारीच्या गुन्ह्यासाठी वन कायद्यामध्ये 3 ते 7 वर्षांच्या कारावासासह आर्थिक दंडाचीसुध्दा तरतुद आहे. या घटनेनंतर वन गुन्ह्याबाबत नागरिकांकडे माहिती असल्यास 1926 या टोल फ्री नंबरवर कळवावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.