सातारा : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे विद्यार्थी संवाद यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर आहेत. यानिमित्ताने सातार्यात आल्यानंतर त्यांनी जलमंदिर पॅलेसमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजेंनी देखील त्यांचे जल्लोषात स्वागत करून राज ठाकरे यांच्या सोबतच्या मैत्रीला उजाळा दिला. सातार्यात येऊन राजेंना भेटले नाही, असे होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी दिली. तर, आपला मुलगाच घरी आल्यासारखे वाटले, असे उयनराजे म्हणाले. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना 'बलगारी मॅन' हा पर्फ्युम भेट दिला.
अमित ठाकरेंचे सातार्यात जल्लोषी स्वागत : विद्यार्थी संवाद यात्रेच्या निमित्ताने अमित ठाकरे शनिवारपासून पश्चिम महाराष्ट्र दौर्यावर आले आहेत. शनिवारी सायंकाळी सातार्यात त्यांचे जंगी स्वागत झाले. शिरवळपासून ते कोल्हापूरपर्यंत महामार्गावर त्यांच्या स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने जिल्ह्यातील वातावरण मनसेमय होऊन गेले आहे. रविवारी अमित ठाकरे यांनी जलमंदीर पॅलेसमध्ये जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उदयनराजेंच्या मैत्रीला त्यांनी उजाळा दिला.
आमच्यात कौटुंबिक संबंध : अमित ठाकरे यांचे जलमंदीर पॅलेसमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. उदयनराजेंनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. काही वेळ त्यांनी कौटुंबिक संबंधांना उजाळा दिला. छत्रपती उदयनराजेंच्या आणि राजसाहेबांच्या मैत्रीतील जिव्हाळ्याची प्रचिती आली. सातार्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही, असे होऊ शकत नाही. आमच्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत. त्यामुळे ही स्नेहभेट होती. आपला मुलगा घरी आल्यासारखे वाटले, असे उदयनराजे म्हणाले. त्यामुळे खासदार उदयनराजेंना भेटून मला खूप बरे वाटले, अशी प्रतिक्रिया अमित ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
मुलगाच घरी आल्यासारखे वाटले : माझ्या मित्राचा मुलगा भेटायला आला, पण माझाच मुलगा घरी आल्यासारखे वाटले, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली. अमित आता तरूण राहिलेला नाही तर प्रौढ झाला आहे. त्यामुळे त्याला 'बलगारी मॅन' हा पर्फ्युम भेट दिला आहे. असे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पश्चिम महाराष्ट्र दौर्यासाठी अमित ठाकरे यांना खासदार उदयनराजेंनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उदयनराजे समर्थक तसेच मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.