सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले यांनी आज साताऱ्यातील राष्ट्रवादी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात चर्चांना पेव फुटला आहे.
2019 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात आज (गुरूवार) मुलाखती चालू आहेत. १७ इच्छुकांचे अर्ज आल्याने सर्वांच्या मुलाखती होणार आहेत. परंतु, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी अर्जही केला नव्हता आणि ते मुलाखतीला पण हजर राहिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.
मध्यंतरी शिवेंद्रराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होती. त्यांच्या मतदारसंघात त्यांना पक्षातूनच अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी तक्रार त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. आता शिवेंद्रराजे पक्षाने घेतलेल्या मुलाखतीला गैरहजर असल्याने खळबळ उडाली असून राष्ट्रवादीला मोठा हादरा बसल्याचे दिसून येत आहे.