सातारा : सातारा नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने राजे घराण्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. संस्था स्थापन करून लोकांचे पैसे खाणारे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले कसे? अशी टीका खासदार उदयनराजे भोसलेंनी शिवेंद्रराजेंवर केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना टोलनाके चालवणारे छत्रपती घराण्यात कसे काय जन्माला आले, असा जळजळीत सवाल करत शिवेंद्रराजेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उदयनराजेंनी किती संस्था काढल्या? : साताऱ्यातील गोडॊली तळ्याच्या सुशोभिकरणावेळी उदयनराजेंनी केलेल्या टीकेला शिवेंद्रराजेंनी सोमवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. या पत्रकार परिषदेत शिवेंद्रराजे म्हणाले की, उदयनराजेंनी काेणत्या संस्था काढल्या आणि किती लाेकांचे संसार चालविले हे त्यांनी सांगावे. छत्रपती घराण्यात जन्मलेल्यांनी टाेलनाका चालवावा. लाेकांकडून पैसे वसूल करावेत हे कितपत याेग्य आहे? पुर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे वसूली करणाऱ्यांना चाप लावायचे. परंतु सध्या वेगळेच सुरु असल्याचा टाेलाही आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांनी लगावला.
काय म्हणाले होते उदयनराजे? : सातारा विकास आघाडी ही लोकांची आघाडी आहे. आमचा आणि त्यांचा जाहीरनामा बघा. आम्ही आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कामे केली. त्यांच्या अजेंड्यात नसलेली कामे केली म्हणतात. मी त्यांच्या बाबतीत बोलून वेळ वाया घालवला आहे. मी ज्यांच्याबद्दल बोललो त्यांची पात्रता नाही. दुसऱ्याला कमी लेखून कोणी मोठा होत नसतो, असे उदयनराजेंनी म्हटले होते.
आम्ही जगलो, झिजलो लोकांसाठी : जनमत आजमावायचे असेल तर सातारा कशाला महाराष्ट्रात चला. खरे-खोटे करायचे असेल तर सातारच्या गांधी मैदानावर समोरासमोर या, असे आव्हानही उदयनराजेंनी दिले होते. एवढा भ्रष्ट असतो तर मला कोणी स्विकारले असते का? आम्ही आजपर्यंत जगलो, झटलो, झिजलो फक्त लोकांसाठी, असेही उदयनराजे म्हणाले होते.
अधिवेशन काळात उदयनराजे कुठे असतात? : लोकसभेच्या अधिवेशनाला खासदार गेलेले नाहीत, यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना डिवचले होते. अधिवेशनाच्या काळात ते कुठे असतात, हा प्रश्न खरे तर त्यांनाच विचारायला हवा, असे खोचक उत्तर त्यांनी दिले होते.