कराड (सातारा) - मित्रांसोबत पोहायला गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाचा रविवारी (दि. 1 एप्रिल) दुपारी शिरवडे (ता. कराड) येथील कृष्णा नदीत ( Krishna River ) बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने, असे त्याचे नाव आहे. तो इयत्ता सहावी वर्गात शिकत होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच सह्याद्री कारखाना परिसरावर शोककळा पसरली.
पोटाखालचा थर्माकोल सुटल्याने ओंकार बुडाला - ओंकार हा मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेला होता. तो थर्माकोलच्या साहयाने नदीत पोहत असताना त्याच्या पोटाखालचा थर्माकोल निसटला आणि तो पाण्यात बुडाला. ओंकारला पाण्यात बुडताना पाहून त्याचे मित्र घाबरले. त्याच्या मित्रांनी ही माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर सर्वांनी कृष्णा नदीपात्राकडे धाव घेतली. कराड येथील पोहणार्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दीड तासानंतर ओंकारचा मृतदेह शोधून काढला. आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृतदेह पाहून ओंकारच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला.
सह्याद्री कारखाना परिसरावर शोककळा - कृष्णा नदीपात्रात शाळकरी मुलगा बुडाल्याची बातमी परिसरात समजताच शिरवडे येथील कृष्णा पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. शाळकरी मुलाच्या मृत्युमुळे सह्याद्री कारखाना परिसरावर शोककळा पसरली. या घटनेची नोंद तळबीड पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा - Minor Girl Murder Satara : प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आई-वडीलांकडून हत्या; डोंगरात पुरला मृतदेह