सातारा - मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर निलेश राणे यांनी टीका केली होती. या टिकेला गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले ज्यांना कोणी विचारत नाही आणि ज्याना काम नाही तेच असे बोलत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाबळेश्वर येथे तीन दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत. त्यावर भाजप नेते निलेश राणेंनी टीका केली आहे. "१९९५ पासून मी सहा मुख्यमंत्री पाहिले. उद्धव ठाकरेंच्या आधी एकाही मुख्यमंत्र्यांनी सुट्टी घेतल्याचे आठवत नाही. यांना येऊन तीन महिनेच झाले आहेत अशात तीन दिवस सुट्टीवर जाण्याचे कारण काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणता पराक्रम केला? झेपत नसेल तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडा " अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे.
निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना काहीही काम नाही असंही म्हटलं आहे. सगळे निर्णय अजित पवारच घेत आहेत. राज्यात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री जास्त कार्यक्षमता दाखवून काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांना सुट्टीवरच राहूद्यात कारण आल्यावरही ते गोट्याच खेळतील, अशी बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली आहे.
या वरती गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजप नेते निलेश राणे यांच्यावरती जोरदार टीका केली. ते म्हणाले ज्यांना कोणी विचारत नाही आणि ज्यांना काम नाहीत तेच असे बोलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टी साठी आले असले तरी या भागातील काम करत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील उपस्थित असून जिल्ह्यातील आडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करतच आहोत, अश्या बोलण्याकडे लक्ष आम्ही देत नाही. अस म्हणत देसाई यांनी राणे यांचा समाचार घेतला .