सातारा - राज्यातील 151 तालुक्यात केंद्राची वाट न पाहता दुष्काळ जाहीर करून दुष्काळग्रस्तांना मदत व्हावी म्हणून आठ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे जाणता राजाने दुष्काळाचे राजकारण न करता सूचना कराव्यात, अशी टीका मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनच्या चारा छावणीला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
दुष्काळाशी सामना करणाऱ्या माण व खटाव तालुक्यात मागेल त्याला छावणी व मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचा टँकर दिला जाईल. येथील चारा छावणी जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंत शासकीय अनुदानावर छावणी सुरू ठेवा. शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चारेगावकर, माजी आमदार दिलीप येळगावकर, अनिल देसाई, माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिंन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिंन्हा, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेट वीरकर उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, राज्यात सध्या 1 हजार 300 जनावरांच्या छावण्या सुरू असून यामध्ये साडेआठ लाख जनावरे आहेत. तर पाच हजार पाण्याचे टॅंकर सुरू आहेत. राज्यात पाणी व चाऱ्यातून एकही जनावर राहणार नसून एक लाख हेक्टरवर चारा लागवडीसाठी बियाणे शेतकऱ्यांना पुरवण्यात आली आहेत. शासकीय जमिनीवर लागवड करण्यात आल्याने येत्या जून महिन्यापर्यंत राज्याला पुरेल एवढ्या चाऱ्याची सोय सरकारने करून ठेवली आहे. राज्यातील 67 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 45हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनतेच्या हाताला काम नसलेल्या पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून. नव्याने अजून पाच लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल, अशी सोय करून ठेवली आहे. माणगंगा नदीमध्ये पाणी सोडण्याच्या मागणी संदर्भात ते म्हणाले, संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांशी बोलून लवकर पाणी कसे देता येईल हा प्रश्न कसा मार्गी लागेल त्यासाठी आजच बोलून घेणार आहे.