कराड - कोयना नदीपात्रात कराड तालुक्यातील तांबवे पुलाखाली हँड ग्रेनेड सापडले होते. मात्र, त्या संदर्भातील लिखित रेकॉर्ड उपलब्ध नसल्याची माहिती भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी (पुणे) येथील दारूगोळा निर्मिती फॅक्टरी प्रशासकीय विभागाचे कर्नल धिंग्रा यांनी एटीएस आणि कराड ग्रामीण पोलिसांना दिली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास अशक्य असल्याचेही धिंग्रा यांनी तपास यंत्रणांना सांगितले आहे. यामुळे हँड ग्रेनेड कुणी टाकले? याचे गुढ कायम राहणार आहे.
ते हँड ग्रेनेड 1961 सालातील?
तांबवे येथील कोयना नदीपात्रात मासेमारी करणार्यांच्या गळाला 17 मे रोजी प्लॅस्टिकची पिशवी लागली होती. पिशवीत तीन जिवंत हँड ग्रेनेड आढळले होते. इलेक्ट्रीक करंट देवून तिन्ही हँडग्रेनेड ब्लास्ट करण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासामध्ये एटीएस आणि कराड ग्रामीण पोलिसांनी भारतीय संरक्षण विभागाच्या खडकी (पुणे) येथील आयुध निर्माण फॅक्टरीशी (दारूगोळा कारखाना) संपर्क साधून हँडग्रेनेड निर्मितीची माहिती घेतली. ते हँड ग्रेनेड 1961 सालात तयार झाल्याची माहिती हाती आली. त्यानंतर हँड ग्रेनेड कुणाला अॅलॉट (वाटप) केले होते? यासंदर्भातील माहिती मिळविण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांनी केला. पण, त्या काळातील लिखित रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे माहिती मिळू शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मग हे हँड ग्रेनेड कोणी टाकले?
त्यामुळे तांबवे येथे कोयना नदीपात्रात हँड ग्रेनेड कोणी टाकले? याचा छडा लावणे अवघड झाले आहे. कर्नल धिंग्रा यांनीही एटीएस आणि पोलिसांना हँड ग्रेनेड प्रकरणाचा तपास आता अशक्य असल्याचे सांगितले आहे.
नदीत सापडलेले हँड ग्रेनेड 60 वर्षापूर्वीचे असल्यामुळे त्याचा स्फोटही होऊ शकला नसता, असेही आयुध निर्माण फॅक्टरीच्या सुत्रांचे म्हणणे आहे. तर, 'हँड ग्रेनेडच्या सेफ्टी पिनचीही कालमर्यादा असते. तसेच हँड ग्रेनेडमध्ये डिटोनेटरही नसावे. त्यामुळे त्या हँड ग्रेनेडचा स्फोट होऊ शकला नसता. इलेक्ट्रीक करंट दिल्यामुळेच त्यांचा स्फोट होऊ शकला', असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
तपासात ही माहिती आली समोर
'कोयना नदीपात्रात सापडलेले हँड ग्रेनेड 1961 साली तयार करण्यात आले होते. निर्मितीनंतर 7 वर्षात ते वापरून नष्ट केले जातात. यामुळे ते रेकॉर्डवरून कमी होतात. 1967 च्या दरम्यान ते अॅलॉट (वाटप) झाले असावेत. 10 वर्षांची सेवा झाली असेल त्यालाच हँड ग्रेनेड दिले जातात. मिलिट्री, पॅरा मिलिट्री फोर्स, आयटीबीपी, एसआरपीएफ यापैकी एखाद्या युनिटला हँड ग्रेनेड दिले असावेत', अशी माहिती या हँड ग्रेनेडच्या तपासातून समोर आली आहे.
हेही वाचा - मृत्यूनंतरही अवहेलनाच! जेसीबीच्या सहाय्याने पुरला मृतदेह