सातारा - म्हसवड येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानची देवदिवाळीस मंगळवारी (दि १५) भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधील म्हसवड शहर व मंदीर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी दिली.
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रे संदर्भात म्हसवड पोलीस ठाण्याच्या आवारात दुपारी घेण्यात आलेल्या बैठकीत शैलेश सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली. यावेळी दहिवडीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. देशमुख, माणच्या तहसीलदार बाई माने, रथाचे मानकरी अजितराव राजेमाने, विलासराव माने, नगराध्यक्ष तुषार विरकर, उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने, मंदिराचे सालकरी व सिध्दनाथ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त, सचिव, मानकरी उपस्थित होते.
कोरोनाची पार्श्वभूमी
कोरोनाची साथ सुरु असुन म्हसवडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे यात्रेकरु व तेथील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने श्री सिध्दनाथ देवस्थानची यात्रा भरवलीच जाणार नाही. दिनांक 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर या काळात संचार बंदीचे आदेश देण्यात येणार आहेत.
शासनही यात्रेस परवानगी देणार नसल्याचे शैलेश सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
व्यावसायिकांच्या दुकानांना प्रतिबंध
यात्रेतील पारंपरिक रथ मिरवणूकीवरही बंदी घालण्यात आली असुन यात्रा मैदानात व्यावसायिकांनी दुकाने थाटू नयेत असे आवाहन करण्यात आले. यात्रा कालावधीत म्हसवडकडे जाणारे सर्व रस्ते सील करुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांना यात्रा व मंदीर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार मंदीरातील धार्मिक कार्यक्रम पुजारी मंडळीच्या उपस्थित शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसारच धार्मिक विधी पार पाडतील.
परगावच्या भाविकांनी येऊ नये
या बैठकीत यात्रा कालावधीत परगावच्या भाविकांनी येऊ नयेत असे आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार बाई माने, अजितराव राजेमाने, दिलीप किर्तने, युवराज सुर्यवंशी, अकील काफी,पृथ्वीराज राजेमाने आदींनी चर्चेत भाग घेतला.या बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी श्री सिध्दनाथ मंदीर, यात्रा परिसर व श्रीच्या रथास उपस्थितांनी भेटी देऊन पाहणी केली.
सातारा जिल्ह्यात यात्रांचा हंगाम
म्हसवड येथील यात्रेपासुनच सुरु होतो. म्हसवड येथील यात्रेस सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते. शासनाने यात्रा रद्द करून पुढील सर्व यात्रा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नैमित्तिक पूजा मात्र होणार
या वेळेला सिद्धनाथ मंदिरातील पुजारी यांना नैमित्तिक पूजा करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. 50 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये सिद्धनाथ मंदिरांमध्ये नैमित्तिक पूजा करावी, असे आवाहन करण्यात आले अाहे. भाविकांनी या यात्रेस उपस्थित राहू नये असे आवाहन प्रांताधिकारी देशमुख यांनी केले आहे.
अशी होते यात्रा
म्हसवड येथील रथ उत्सव हा दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. या उत्सवासाठी आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र' इत्यादी राज्यांमधून सुमारे पाच लाख भाविक येतात. म्हसवड शहराच्या नगरप्रदक्षिणे नंतर रथ यात्रा पूर्ण होते. या यात्रेवर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करण्यात येते.
हेही वाचा - शेतकरी बांधवांचे दुःख पाहून वेदना होतात - धर्मेंद्र